गणेशोत्सवात खाण्याची मौज वेगळीच; जाणून घेऊया काही ‘रेसिपीज’ !

0

पुणे,(शाजिया शेख)- गणेशोत्सव आठवड्याभरावर येऊन ठेपला असून सर्वांनाच बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. गणेशोत्सवात आनंदाला वेगळेच उधाण आलेले असते. त्यात गणेशोत्सवात खाण्याची मौज वेगळीच असते. उकडीचे मोदक, बेसनाचे लाडू या पदार्थानी पोट भरले तरी मन मात्र भरत नाही. त्याशिवाय जिथे जावे, तिथे ताटात गोडाचे पदार्थ येत असतात.

गणपतीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याच्या यादीमधील सर्वात पहिला क्रमांक मोदकांचा लागतो. आपल्याकडे प्रातांनुसार मोदक तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. कोकणात जिथे नारळ व तांदूळ जास्त प्रमाणात असतो, तिथे उकडीचे मोदक तयार केले जातात. आणि इतर भागांमध्ये तळणीचे मोदक केले जातात.

उकडीच्या मोदकात खोबरे व गूळ याचा वापर केला जातो. खोबऱ्यात कॅल्शिअम, लोह व फॅटी अ‍ॅसिड असते. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण असले तरी प्रमाणात खाल्लय़ास कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढत नाही. उकडीच्या मोदकाच्या हे सत्व असतात, त्यामुळे आपण उकडीचे मोदक कसे बनवितात याची प्रक्रिया, (रेसिपी)जाणून घेणार आहोत.

उकडीचे मोदक बनवण्यासाठी

-साहित्य

१ वाटी (१५० ग्राम) बासमती तांदुळाचे पीठ, चिमटीभर मीठ, १ वाटी पाणी,

सारण बनवण्यासाठी

१ वाटी ओल्या नारळाचा कीस, पाव वाटी गुळ, २ चमचे साखर, १/२ छोटा चमचा वेलची पावडर, ४-५ थेंब केशर

-कृती

एका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्या. सर्व एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने मध्यम आचेवर हे भांडे ठेऊन, गुळ वितळून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे. ४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरा.

एका पातेल्यात १ वाटी पाणी घेऊन, चिमुटभर मीठ घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. पाण्याला उकळी येताच, त्यात तांदुळाचे पीठ घालून, चांगले ढवळावे. हे भांडे आचेवरून उतरून, १० मिनटे झाकून ठेवावे. १० मिनिटांनी, मोठ्या परातीत ही उकड घेऊन, गरम असतानाच मळून घ्यावी. मळताना आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून, शेवटी थोडे तेल लावून मऊसर गोळा तयार करावा. मोदक करेपर्यंत हा गोळा झाकून ठेवावा.

मोदकपात्रात लागेल तेवढे पाणी घेऊन ते गरम होण्यास ठेवावे. आता उकडीतून छोटा लिम्बाएवढा गोळा घेऊन, दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने खोलगट पारी करावी. ह्या पारीत, एक मोठा चमचा पुरण घालावे. पुरण घातल्यावर, कडा चिमटीत पकडून मोदकाच्या कळ्या काढाव्यात. आता मोदकाच्या तळापासून थोडे थोडे आवळत घेऊन, छान मोदकाचा आकार वळावा. ह्याच प्रमाणे सगळे मोदक करून घ्यावेत.

आता केळीच्या पानाला थोडा तेलाचा हाथ लावून हे पान मोदकपात्रात ठेवावे. ह्या पानावर प्रत्येक मोदक पाण्यात भिजवून नीट लावून ठेवावा. आता मोदकपत्राचे झाकण लावून, १५ मिनटे मोदक उकडून घावेत. पूर्ण तयार झाल्यानंतर गरम गरम साजूक तूप घालून खायला घ्यावेत.

तळलेले मोदक बनविण्यासाठी

-साहित्य

१/२ कप खिरापत, १/२ कप मैदा, १/२ कप बारीक रवा, २ टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, तळण्यासाठी तेल/ तूप, १ टीस्पून दूध, ओल्या नारळाचे सारण भरायचे असेल तर ओल्या नारळाच्या करंज्यांचे सारण वापरावे.

-कृती

मैदा आणि रव एकत्र करून घ्यावा. २ चमचे तेल कडकडीत गरम करून मोहन घालावे. किंचीत मिठ घालून हाताने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने पिठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हानाने मुखर्‍या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात १ चमचा सारण भरावे. सर्व मुखर्‍या एकत्र करून कळी बनवावी आणि १ थेंब दुधाचं बोट घेवून कळी निट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावे.