मुंबई : गणरायाच्या आगमणाची जशी लगबग गणेशोत्सव मंडळांची होती, तशी सजावटीचीही घाई सुरू होती. उद्या गणरायाच्या आगमनासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी तयारी पूर्ण केली होती, उद्या भक्तीभावाने गणरायांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मागील एक महिन्यापासून विविध मंडळांची लगबग सुरू होती. मंडळ नोंदणी करण्याबरोबरच मंडपांची परवानगी घेण्याचे कामही वेगाने सुरू होते. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी, परळ, शिवडी, वडाळा, दादर या मराठमोळ्या विभागात गणेशोत्सवाची क्रेझ आजही कायम आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोहळा शांततेत पार पडावा यासाठी ठिकठिकाणी गणेश मंडळांच्या बैठकाही आधीच पार पडल्या आहेत.
यंदाच्या देखाव्यांमध्ये पर्यावरणाला प्राधान्य
गणेशोत्सवातून प्रदूषण टाळून इकोफ्रेंडली उत्सव साजरा करण्यावर अनेक मंडळांनी भर दिला आहे. तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने देखावे उभारले जात आहेत. शिवडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरण व नद्यांचे महत्त्व सांगणारा देखावा उभारला आहे. या देखाव्यातून नैसर्गाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. देखाव्यांबरोबर गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, विविध सामाजिक, शैक्षणिक, रोजगार मेळावे, वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. विक्रोळी कन्नमवार नगरमधील गणेश मंडळाने राजमहालचा देखावा उभारला आहे. जुन्या पद्धतींवर आधारित हा देखावा असणार आहे. धर्माच्या नावाने देखावे उभारण्यास मनाई आहे. बर्फ किंवा नारळांचा वापर करून गणेशमूर्तींची विटंबना करू नका, असे आदेश मंडळांना दिले आहेत.