पुणे । गणेशोत्सव हा लोकजागर आणि लोकप्रबोधनाचा उत्सव आहे. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते हे अतिशय भारलेले असतात. खर्या अर्थाने कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यकर्ते समाजाकरिता काम करीत आहेत. कार्यकर्त्यांमुळेच पुण्याचा गणेशोत्सव यशस्वी होतो. अनेकदा गणेश मंडळांशी समन्वय साधताना पोलीस कमी पडतात, परंतु कार्यकर्ते कमी पडत नाहीत, असे मत पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी व्यक्त केले.
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने लोकमान्य जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन उद्यानप्रसाद कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गुरुजी तालीम मंडळचे अध्यक्ष प्रविण परदेशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त बसवराज तेली, अखिल मंडई मंडळचे अध्यक्ष अण्णा थोरात, अशोक गोडसे, माजी उपमहापौर दीपक मानकर, पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, प्रतिष्ठानचे विनायक घाटे, अशोक जाधव, शिरीष मोहिते उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्कारचे स्वरुप होते.
पुस्तकाचे प्रकाशन
लोकमान्य गणेशसेवा पुरस्कार रऊफ हाजी युनूस कुरेशी यांना तर आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार संजय कडवे, फिरोज खान, राजू जाधव, हनुमंत शिंदे, राहुल पाखरे यांना देण्यात आला. नक्षलग्रस्त भागात काम करणारे उदय जगताप यांच्या गोंडवनाचा सांगाडा या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. गौरव घुले यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.