कर्जत । नेरळमध्ये टाळ मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गुरुवारी नेरळ येथील गणेश घाटावर गणपतीचे भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला तसेच पोशीरमध्ये आणि परिसरात दोन दिवसांसाठी आलेल्या माहेरवाशीणींनी गौराईचेदेखील विसर्जन करण्यात आले. गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी नेरळ येथील गणेश घाटावर मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणेश घाटावर जमा झालेले निर्माल्य आणि प्लास्टिकच्या पिशव्या जमा करण्याचे कार्य करीत होते.
जमा झालेले निर्माल्याचे योग्य ते व्यवस्थापन नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रमिक खरात यांनी सांगितले. गणेश घाटावर गणरायाचे विसर्जन करतानाच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! असे साकडे भाविकांनी गणरायाला घातले. यावेळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश घाटावर विसर्जनासाठी आलेल्या गौरी आणि गणपतीचे स्वागत करण्यात आले होते.