तलावात प्रचंड गाळ व शेवाळे साठले
पिंपरी : – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरण पसिरात असणार्या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या तलावाची नियमित स्वच्छता न केल्यामुळे तलावामध्ये प्रचंड गाळ साठला आहे. तलावामध्ये शेवाळेही साचले आहे. या तलावाची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरात येणारे नागरिक करीत आहेत. गणेश तलावाच्या संपूर्ण दोन ते अडीच एकर परिसरामध्ये झाडी आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे नागरिक फिरायला येत असतात. सुमारे 18 एकर जागेचा हा परिसरात नयनरम्य आहे. तलावाच्या एका बाजूने फिरता येते. दुसर्या बाजूने तलावाकडे जाण्याचा रस्ता असून उर्वरित दोन बाजू बंदिस्त आहेत.
विविध प्रकारच्या पक्षांची हजेरी
निसर्गरम्य वातावरणामुळे येथे कधी न दिसणारे पक्षीही दिसू लागले आहेत. वेेगवेगळ्या जातीचे हे सर्व पक्षी येणार्या नागरिकांसाठी विशेष कौतुकाची बाब ठरत आहेत. पूर्वी या तलावातून संत ज्ञानेश्वर उद्यान, संत तुकाराम उद्यान आणि गजानन महाराज उद्यानाला पाणीपुरवठा केला जात होता. परंतु संत ज्ञानेश्वर उद्यानाला मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी कमी झाल्याने हा गाळ दिसू लागला आहे. तलावातील गाळ काढल्यास आणि तेथे पाण्याची सोय केल्यास तेथे बोटिंगची व्यवस्था करता येईल.
बोटिंग शक्य नाही
यासंदर्भात उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे म्हणाले की, तलावाचा कोपर्यातील 12 फूट भाग वगळता उर्वरित भाग उथळ आहे. त्यामुळे सध्या तरी तेथे बोटिंग सुरू करणे शक्य नाही. दोन बोटींच्या सहाय्याने तलावातील वेली काढल्या होत्या. आकुर्डीच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पातून तलावात येणारे पाणी गाळ काढण्यासाठी बंद केले आहे. दोन दिवसांत गाळ काढण्यास सुरवात होईल. 15 दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर नगरसेवक अमित गावडे म्हणाले की, महापालिकेने मध्यंतरी तलावातील गाळ काढला होता. परंतु, तो पूर्णपणे काढला गेला नाही. गाळ पूर्णपणे काढण्याची सूचना प्रशासनाला करणार आहे.