पुणे । वाहतुकीचे नियम मोडणार्या लोकांना सावध करणारे पोलिस, शाळेत जाणार्या मुलीला सुरक्षेसाठी चिलखत घालत सावध करणारी आई, वाहन चालवित असताना मोबाईलवर बोलणार्याला साधव करणारा यमदूत, रांगेत जाणार्या मुंगीताईंची शिस्त… अशा विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करीत गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते पोलिसांबरोबर रस्त्यावर उतरले. लक्ष्मी रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनचालकांना गुलाबाची फुले देत स्वयंशिस्तीचा संदेशही त्यांनी दिला.
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे नगरकर तालीम चौक येथे वाहतूक जगजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज पाटील, नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, तांबडी जोगेश्वरी मंडाळाचे राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे राजू परदेशी, विनायक कदम, विकास पवार, किरण चौहान, प्रदीप इंगळे, विठ्ठल मोगलाईकर, संजय शिंदे, कुमार शिंदे, जितेंद्र आंबासणकर, कुमार रेणूसे आदी उपस्थित होते.
मागील आठवड्यात प्रमुख गणेशोत्सव मंडळे व पोलीस पदाधिकार्यांच्या झालेल्या बैठकीत गणेशमंडळांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सहभाग घेण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार मंडळे सहभागी होत असून इतर मंडळांना वाहतूक जनजागृती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन ते करणार आहेत. प्रभाकर ढमाले म्हणाले, शहरात वाहतूक समस्यांनी भीषण रूप घेतले आहे. दिवसेंदिवस या समस्या वाढत असताना त्या सोडविण्यासाठी व वाहतुकीबाबत जनजागृती करण्यासाठी गणेश मंडळांना पोलिसांनी सहभागी करून घेतले आहे. वाहतुकीच्या समस्या या मानवनिर्मित असून त्या सोडविण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर नक्कीच हा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद तांदळे यांनी आभार मानले.