पुणे । गणेश मंडळांना दिलेले परवानगी पत्र मंडळांनी सर्वांना दिसेल असे दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सदर परवानगी दर्शनी भागात लावण्यात आली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी पुणे शहर व हवेली उपविभागीय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक स्थापन करण्यात आले असून यासंदर्भात पाहणी करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र रसाळ, डॉ. शितलकुमार मुकणे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी विनोद चव्हाण आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
घाटांवर एनडीआरएफचे पथक
गणपती विसर्जनाच्या दिवशी तातडीच्यावेळी अॅम्ब्युलन्सची सुविधा ठेवणे, नामांकीत हॉस्पीटलमध्ये 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीवेळी नदीच्या घाटावर तसेच घाटाकडे जाणार्या रस्त्यावर विद्युत व्यवस्था आणि खड्डे दुरुस्त करण्यात यावे, गर्दीबाबत योग्य नियोजन करणे तसेच आवश्यक असलेल्या घाटांवर एनडीआरएफचे पथक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनावरांची अवैध वाहतूक होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील 11 टोल नाक्यांवर पोलिस प्रशासन आणि पशुसंवर्धन अधिकारी यांचे तपासणी पथक नेमण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मुठे यांनी सांगितले.