गतिरोधकांमुळे अपघातांना हातभार

0

भुसावळ। शहरातील रस्त्यांवरील गतिरोधकांची पूर्वसूचना देणारी यंत्रणाच शहरात अस्तित्वात नसल्याने परिणामत: अपघातांना निमंत्रण मिळावे, अशी वास्तव परिस्थिती रस्त्यांवर निर्माण झालेली दिसत आहे. तरीही प्रशासनाचे मात्र या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने ही बाब नागरिकांच्या जिवीतासही धोकादायक ठरत आहे. वरणगाव रोड जामनेर रोड, जळगाव रोड, आरपीडी रोड आदी प्रमुख मार्ग आहेत.

या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुक वाढलेली आहे.
वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या रस्त्यांवर आवश्यकतेनुसार स्पिड ब्रेकर बसविण्याऐवजी कुठलेही नियम न पाळता रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. तसेच या गतिरोधकांची पूर्वसुचना देणारी यंत्रणाच या रस्त्यांवर कुठेही नसल्याने याचा उलटा परिणाम होत आहे.

वाहने आदळल्याने होतात अपघात
धावपळीच्या जीवनशैलीत गतिरोधकच अपघाताला हातभार लावत आहेत. समोर गतिरोधक आहे. याची कल्पनाच वाहनधारकांना मिळत नाही, पूर्वकल्पना नसल्याने एकतर वाहन उसळणे, दणक्याने वाहनावरील नियंत्रण सुटणे, अथवा अचानक ब्रेक लागून वाहन स्लिप होणे, दरम्यान वाहन दुभाजकावर धडकणे, फुटपाथवर पडणे, समोरील वाहनांवर आदळणे यात जखमींची संख्या वाढणे अथवा एखाद्याचा नाहक बळी जाणे असे दुर्दैवी प्रकार घडतात.

साईन बोर्डची आवश्यकता
शहरात जोडणारी यावल, जळगाव आणि आरपीडी रोड तीन मार्ग व शहरातील जामनेर रोड या रस्त्यांवर अनेक ठिकाणी गतिरोधक आहे. दरम्याच्या वळणावरही स्पिड ब्रेकर्सची उपलब्धी आहे. परंतु या स्पिड ब्रेकर्सजी पूर्वसूचना देणारे पांढरे पिवळे पट्टे रिफ्लेक्टर किंवा एवढ्या अंतरावर गतिरोधक आहे. असे फलक अथवा साईन बोर्ड अशी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याने असलेल्या गतिरोधक यंत्रणेचा उलटा परिणाम होऊ लागला आहे. वेगवान वाहनांना गतिरोधक लक्षात येत नाही अथावा दिसत नाही त्यामुळे त्यावरुन गाडीचे नियंत्रण सुटे किंवा तत्काळ ब्रेक दाबल्याने अपघात घडणे असे प्रकार वाढत आहेत.

काहींनी गमावला जीव
रस्त्यांवर गतिरोधक बनविण्यासंदर्भात वाहतुक यंत्रणेचे काही नियम असतात मात्र हे सर्व नियम पायदळी तुडवित शहरात जागो जागी गतिरोधक बनविण्यात आले आहेत. यामुळे वाहन चालविणे अतिशय जिकरीचे झाले आहे. तसेच या गतिरोधकांवर पट्टे न मारल्यामुळे अनावधानाने वाहने आदळून अपघात होत असता. यात काही जणांना तर आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या गतिरोधकांवर पट्टे तसेच साईन बोर्ड बसविण्याची मागणी वाहनधारकांतर्फे करण्यात येत आहे.