बारामती । गतीरोधक बांधण्याचे काम बारामती नगरपालिका निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचे दिसून येते. 10 टक्के डांबर आणि माती मिश्रीत गतीरोधक बांधण्याचे जणू काही नवीन तंत्रज्ञानच नगरपालिकेने विकसीत केले आहे. त्याच्याही पुढची हद्द म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राहत असलेल्या भिगवण रोडवरील सहयोग सोसायटीच्या समोर बिगर डांबराचेच गतीरोधक बनविण्याचा महान पराक्रम नगरपालिकेने केला आहे.
नगरपालिकेचा मनमानीपणा
गतीरोधक बांधण्यासाठी जिल्हा गतीरोधक समितीकडून परवानगी घ्यावी लागते. ही समिती जागेची पाहणी करून नगरपालिकेला अहवाल देत. त्यानुसार नगरपालिलेकाल गतीरोधक बांधावे लागतात. असे असताना नगरपालिकेने मनमानीपणा करत चुकीच्या पध्दतीने गतीरोधक बनविलेले आहेत. त्यामुळे दोनच दिवसात ते उखडले गेले. परंतु या सर्वाचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
90 टक्के गतीरोधक ओबडधोबड
कविवर्य मोरोपंत सोसायटीमध्ये तर एका गतीरोधकावर शेजारचीच माती घेऊन टाकण्यात आलेली आहे. यावरून पालिकेच्या कारभाराची परिस्थिती कशा प्रकारची आहे. हे स्पष्टपणे दिसून येते. मुळातच बारामती शहरातील 90 टक्के गतीरोधक ओबडधोबड बनविण्यात आले असून गतिरोधकासाठी बनविलेल्या सर्वच नियमांची पायमल्ली येथे केलेली दिसून येते. हे सर्व गतीरोधक दुचाकीस्वारांना अतिशय त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाची भावना आहे.
दोनच दिवसात उखडले गतीरोधक
बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील जैन मंदिरापासून पेन्सिल चौकापर्यंत सर्व्हिस रोड जात आहे. या सर्व्हिस रोडवर जागोजागी गतीरोधक बनविण्यात आले आहेत. काही लोकांच्या तक्रारीनंतर सहयोग सोसायटीसमोरील शिवनगर या चौकात व मोरोपंत सोसायटीमध्ये चार गतीरोधक बनविण्यात आले. हे गतीरोधक अवघ्या दोन दिवसापूर्वी बनविलेेले आहेत. यापैकी शिवनगर प्रवेशद्वाराजवळ दोन गतीरोधक बनविण्यात आले असून डांबराचा नाममात्र वापर त्यात करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसात या गतीरोधकाची खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना अपघाताला सामोरे जावे लागेत आहे. तर दुसरा गतीरोधक त्याच स्थितीत आहे. गतीरोधक बनविण्याचे सर्व नियम धाब्यावर बसविलेले आहेत. गतीरोधकाचा आकार व त्यासंबंधित बनविलेले नियम हे येथे धुडकावलेले दिसून येतात.