ठाणे । समन्वय प्रतिष्ठान व वोक्हार्ट हॉस्पीटल यांच्या विद्यमाने लहान मुलांमधील हृद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ठाण्यात खारकर आळी येथील महाजनवाडी हॉलमध्ये करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातूनही अनेक पालक त्यांच्या पाल्याना घेऊन तपासणी शिबिरासाठी आले होते. ज्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असून पाल्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे, अशा गरजू बालकांवर वोक्हार्ट हॉस्पीटलच्या वतीने मोफत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या प्रेरणेने सामाजिक जाणीवेचे भान म्हणून लहान मुलांमधील हृद्यरोग तपासणी शिबिराचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते के. पी. आहद व रवी काळे यांनी सदर शिबीर आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ठाणे शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शंभरहून अधिक रूग्ण शिबिरासाठी उपस्थित राहिले होते. त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली. वोक्हार्ट हॉस्पीटलचे डॉ. बत्रा त्रिवेदी, डॉ. संजय काळे तसेच सिव्हील रूग्णालयाचे डॉक्टर्स यानी मुलांची तपासणी केली. अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते शिबिरास सुरूवात करण्यात आली.