विधानसभेत जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिली कबुली; विधानसभेत चर्चा
पुणेकरांच्या पाणी वापराच्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे
मुंबई – पुणे शहर हे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करत असल्याची कबुली जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. भामा आसखेड धरणातील पाणी हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या २ महापालिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले असले तरी ज्या प्रमाणात आरक्षण आहे, त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर या शहराकडून केला जात असल्याचा आरोप सध्या पुणे पिंपरी महापालिकेवरती केले जात आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भामा आसखेड धरणासाठी सरकारने संपादित केलेल्या जमिनीच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी पुण्यातील पाणी प्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली.
जनजागृतीची आवश्यकता
पुणे शहराची वाढत्या लोकसंख्येप्रमाणे शहराची वाढ ही झपाट्याने होत आहे. त्यामुळे भविष्यकाळात देखील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. मात्र, आजच्या परिस्थितीतही पुणेकर हे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरत असून पुणेकरांच्या पाणी वापराच्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे असल्याचा सूर यावेळी विधानसभेत निघाला. त्यावेळी पुणेकर हे जास्तीचे पाणी वापरत असल्याची कबुली राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.
पुणे शहरासाठीचे पाणी वाटप
खडकवासला संयुक्त प्रकल्पाच्या प्रकल्पीय तरतुदीनुसार पुणे शहरासाठी ५ टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. १९९५ पासून पुणे शहराचा पाणी वापर वाढत गेल्यामुळे २००५ साली शासनाने ११.५० टीएमसी पाणी साठ्यावर आरक्षण मंजूर केले. पुणे महापालिकेला जो ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आलेला आहे, तो करारनामा हा ६ वर्षासाठी करण्यात आलेला आहे. १ मार्च २०१३ ला हा करार झाला असून २८ फेब्रूवारी २०१९ पर्यंतचा हा पाणी वापराचा करार आहे. पुणे महापालिकेने ११.५० टीएमसी पाण्याचा करार असला तरी मागील ६ वर्षापासून पुणे महानगर पालिका ही १६ टीएमसी पाणी वापर करत आहेत.
पुण्याच्या त्रास आजूबाजूच्या तालुक्यांना
पुणे शहराच्या जादा पाणी वापरामुळे दौंड, दापूर आणि बारामती तालुक्यातील सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे विठ्ठल जराड यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार महानगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मापदंडानुसार महापालिकेने पाणी वापरावे, असे आदेश दिलेले आहेत. मात्र या आदेशाप्रमाणे महापालिका पाणी वापरत नाही तर अधिकचे पाणी वापर करत असल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा
टाटाच्या धरणामधून पिण्यासाठी पाणीद्यावे
राज्यामध्ये टाटा कंपनीच्या मालकीच्या धरणामधून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. शेतीचे पाणी कमी करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विरोध नाही. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतीसाठीदेखील पाणी देणे गरजेचे आहे. पाण्याचे नियोजन करत असताना टाटाच्या मालकीची काही धरणे आहेत. टाटा त्यांच्या मालकीच्या धरणातील पाण्यापासून वीज निर्मिती करतात आणि त्यांचे पाणी समुद्रात सोडले जाते. या टाटांच्या धरणातील पाणी हे ग्रॅव्हीटीने पुण्यात येऊ शकते. त्यामुळे टाटाच्या धरणातील पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्य़मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.