जळगाव। चुलीवर ठेवलेले गरम पाणी चिमुकल्याच्या अंगावर पडल्याने तो भाजला गेला होता. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्या साडे तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारा दरम्यान सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला. मोहित एकनाथ पाटील असे मयत बालकाचे नाव आहे.
पाचोरा तालुक्यातील तारखेड येथील एकनाथ नारायण पाटील येथे कुटूंबियांसोबत राहतात. यातच पाच दिवसांपूर्वी कानबाईचा कार्यक्रम असल्याने पाणी गरम करण्यासाठी पातेले (भांडे) चुलीवर ठेपले होते. त्यावेळी एकनाथ पाटील यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा मोहित या बालकाचा धक्का चुलीतील पेटत्या लाकडाला लागला व गरम पाणी असलेले पातेले मोहितच्या अंगावर पडले. यात मोहित भाजला गेला. त्यानंतर त्याला कुटूंबियांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. आज मंगळवारी सकाळी 8.30 वाजता जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना मोहित याचा मृत्यू झाला. मोहित याच्या पश्चात मोठा भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.