गरिबांची कमाई लुटणाऱ्यांचा खेळ बंद केल्याशिवाय थांबणार नाही-मोदी

0

ओडिशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बलांगीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना ओडिशा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘गरीब कुटुंबीयांचे हक्क हिरावून घेणारी प्रत्येक गोष्टी व्यवस्थेतून दूर करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आदिवासांच्या हितांसाठी ओडिशा सरकारने निवडणुकांची वाट पाहत बसू नये, केंद्र सरकारकडून ज्या निधीचा पुरवठा करण्यात आला आहे, त्याचा जनतेच्या भल्यासाठी वापर करावा असे त्यांनी सांगितले.

झारसुगुडातील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कसहीत (एमएमएलपी) अनेक विकास योजनांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले. बलांगीर आणि बिचुपलीदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या नवीन रेल्वेमार्गाचेही उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले.

विरोधकांचा एकजूट होण्याचा प्रयत्न आणि उत्तर प्रदेशातील सपा आणि बसपाच्या आघाडीवर निशाणा साधत मोदी म्हणाले ‘आज देशात माझ्याविरोधात कटकारस्थाने रचली जात आहेत, खोटे आरोप केले जात आहेत. मोदींना मार्गातून हटवण्यासाठी लोक एकजूट होत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की हा चौकीदार गरीबांची कमाई लुटणाऱ्या प्रत्येकाचे खेळ बंद करुनच थांबणार आहे असे मोदी म्हणाले.