पिंपरी ः पुणे, शिवाजीनगर येथील संचेती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे शासनाच्या जागेत उभे असल्याने धर्मादाय रुग्णालय आहे. हाडांच्या आजारांवर सर्व प्रकारचे उपचारांसाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे कायद्याने बंधनकारक असताना अशा रुग्णांना नाकारले जाते. ही सरकारची फसवणुक असून रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
खाटा राखीव ठेवणे बंधनकारक…
शिवाजीनगर येथील संचेती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णालयात हाडांच्या आजारांवर सर्व प्रकारचे उपचार केले जातात. त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध असल्याने राज्यभरातील गरजू रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. शासनाची जागा घेतल्याने हे हॉस्पिटल धर्मादाय रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार तसेच अशा रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, रुग्णालय व्यवस्थापनांकडून गरीबांच्या या कायद्याची सर्रासपणे पायमल्ली सुरू आहे.
अधिकार्यांकडून मिळते चुकीची माहिती…
रुग्ण त्याठिकाणी उपचारासाठी गेल्यानंतर अशा रुग्णांना मार्गदर्शनासाठी बसवण्यात आलेल्या समाजविकास अधिकार्यांची टिम रुग्णांना चुकीची माहिती देतात. हे रुग्णालय धर्मदाय रुग्णालय नसल्याचे सांगत मोफत उपचार होणार नसल्याचे गरीब रुग्णांना सांगितले जाते. उपचाराचा संपूर्ण खर्च भारावा लागेल, असेही रुग्णांना सांगितले जाते. त्यामुळे अनेक रुग्ण विना उपचाराचे निघून जातात. जे रुग्ण उपचारासाठी तयार होतात, त्यांची अक्षरशः लूट केली जाते.