गरिबीवर मात करण्यासाठी उमेदीने कष्ट करणे गरजेचे

0

पिपरी-चिंचवड : गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार्‍याच्या मागे न जाता गरिबीवर मात करण्यासाठी उमेदीने कार्य व कष्ट करायला पाहिजे. पालकांनी मुलांना शिकवणे हा दारिद्र्याच्या बाहेर पडण्याचा खरा मार्ग आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. महापालिकेच्या वतीने पी.डब्ल्यू.डी. मैदान, नवी सांगवी येथे आयोजित पवनाथडी जत्रेत शुक्रवारी (दि.5) महिला बचत गट आवश्यकता, व्याप्ती व उन्नती या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या कार्यक्रमास जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, उषा ढोरे, निर्मला कुटे, नगरसदस्य सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी मांडले वास्तव
हर्डीकर यांनी गरिबांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील जालना शहरात त्यांच्या समवेत राहून त्यांनी सविस्तर माहिती कशी जाणून घेतली. याबाबत उदाहरणासह त्यांनी माहिती सांगितली. गरीब व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सर्वे केला असता यादीमध्ये रॉकेल, दुकानदार, तलाठी यांचे नाव आढळले. खर्‍या गरिबांची नावे मात्र सर्वे यादीमध्ये आढळली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर 10 दिवस राहिलो असता आदिवासींनी दिलेले अन्न खाल्ले, तेथील घराला दारे नव्हते. तेथे खाण्यामध्ये वरीच्या कण्या व भात असतो. आता शिकार करायला जंगले उरले नाहीत. जंगलाचा राजा असलेला आदिवासी ऊसतोडी करु लागला आहे. आपल्या मूळ गावातील घर दारे बंद करुन मुलांचे शिक्षण वार्‍यावर सोडून जंगलाचा राजा असलेला आदिवासी विळे घेऊन गावोगावी शेतात झोपड्या बांधून ऊसतोडी करु लागला आहे. अचानक ऊसाच्या फडाला आग लागल्यावर त्याचे समस्थ कुटुंब रस्त्यावर येते. आणि ते पुन्हा गरिबी अवस्थेत जीवन जगू लागतात, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

पैसा व्यवहारात फिरला पाहिजे
यवतमाळ जिल्ह्यातील जालना शहरात सर्वेसाठी गेलो असताना तेथील महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण 7 पेक्षा कमी आढळले. तेथील महिला होणा-या शारीरिक वेदना निर्मूलनासाठी डॉक्टरकडे न जाता दुखणे अंगावर काढताना आढळल्या. जीवनाचे सार म्हणजे महिला होय. आयुष्य ज्याचे त्याने सुधारले पाहिजे. स्वंय सहाय्यता गट निर्मितीबाबत त्यांनी सांगितले. आवश्यक गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजे. बचत ही आपल्यासाठी करावयाची असते. पैसे व्यवहारात फिरवले जात नाही तोपर्यंत त्याला मोल राहत नाही.

दारिद्र्य पैशात मोजता येत नाही
बचत गट न फोडता तो चालू राहिला पाहिजे. यासाठी महिला बचत गट सदस्यांनी दक्षता घ्यावी. यावेळी स्वयं सहाय्यता गट, महिला बचत गट, दारु बंदी, व्यसन मुक्ती, पशु लसीकरण आदीबाबत विस्तृत माहिती त्यांनी सांगितली. उम्मेद मिशनमध्ये गरीब घटकाचा शोध सुरु झाला. दारिद्र्य पैशात मोजता येत नाही. लाभापासून व आवश्यक सेवा सुविधांपासून वंचित राहणारा घटक म्हणजे गरीब होय. घरातील महिला ही सगळ्यात जास्त गरीब आहे. स्वच्छतेत राहणारा कधीही आजारी पडत नाही. अस्वच्छ परिसर अशुद्ध पाणी, हात पाय न धुणे, नियमीत अंघोळ न करणे, व्यायामाचा आभाव यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. प्रत्येकाने घर परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.