गरीबरथमधून 13 लाखांचे दागिने लांबवणारा हायप्रोफाईल चोरटा जाळ्यात

0

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांची कारवाई : चोरट्याविरुद्ध राज्यभरात 21 गुन्हे

भुसावळ : अप गरीबरथ एक्सप्रेसने मुंबईला निघालेल्या सराफा व्यापारी दाम्पत्याची 12 लाख 80 हजारांचे दागिने असलेली बॅग भुसावळ-जळगाव दरम्यान 3 रोजी मध्यरात्री लांबवण्यात आली होती. या प्रकरणी भुसावळात गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची यंत्रणा कामाला लागली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून दोघा यंत्रणांनी संयुक्त कारवाई करीत किरण शालिग्राम निंबाळकर (35, साईबाबा कॉलनी, वाडी, खामगाव) या हायप्रोफाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीने अमरावती एक्स्प्रेसमध्ये केलेल्या चोरीतील दोन लाख 65 हजारांचा मुद्देमालही काढून दिला आहे. दरम्यान, अटकेतील चोरटा हायप्रोफाईल राहणीमानाद्वारे रेल्वेचे आरक्षित तिकीट काढून केवळ एसी डब्यातूनच चोरी करीत असल्याची माहिती पुढे आली असून आतापर्यंत त्याने राज्यभरात तब्बल 21 ठिकाणी चोर्‍या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गाडरवाराच्या सराफा व्यापार्‍याचे दागिने लांबवले
मध्यप्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात गाडरवारा गावात आशिष दशरथ सोनी हे सराफा व्यापारी दिवाळीच्या सुटीनिमित्त पत्नीसह अप गरीब रथ 12187 गाडीच्या जी/4 कोचमधील बर्थ क्रमांक 40-41 वरून प्रवास करीत असताना 3 रोजी मध्यरात्री 12.30 ते पहाटे साडेचार दरम्यान दाम्पत्याला झोप लागल्याची संधी चोरट्याने त्यांची हॅण्डबॅग भुसावळ-जळगावदरम्यान लांबवली. या हॅण्डबॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, अंगठी, बिंदी, चैन, बांगड्या, घड्याळ, मोबाइल, एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅन कार्ड असा मिळून एकूण 12 लाख 80 हजारांचा ऐवज होता. पहाटे जाग आल्यानंतर दाम्पत्याला बॅग चोरीची माहिती कळताच त्यांनी गाडीतील तिकीट निरीक्षकाला माहिती दिली मात्र तोपर्यंत गाडी भुसावळ विभागातून निघून गेल्याने मुंबई आल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला तर ही चोरी घटना भुसावळ विभागातील असल्यामुळे भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता.

समांतर यंत्रणेने लावला गुन्ह्याचा छडा
रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी समांतर या गुन्ह्याचा तपास करीत प्रवासी निघालेल्या स्थानकापासून ते जळगावपर्यंतच्या स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना जळगाव स्थानकावर संशयीत प्रवासी उतरताना दिसला. आरोपीने नंतर मुंबईचे तिकीट काढून नंतरच्या गाडीने मुंबईदेखील गाठली तर इकडे गरीबरथमधील तिकीट निरीक्षकाला याबाबत विचारणा केल्यानंतर जळगाव प्रवासाचे कुणाचेही तिकीट नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फुटेजमधील छबी व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासल्यानंतर आरोपी किरण निंबाळकर यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

अमरावती एक्स्प्रेसमध्येही केली चोरी
आरोपी किरण निंबाळकर याने 1 रोजी अप अमरावती एक्स्प्रेसमधून महिला प्रवासी शुभांगी आशिष चापे (36, उलवे, ननवी मुंबई) यांची पर्स लांबवली होती. या पर्समध्ये सोन्याचे दागिने मिळून तब्बल दोन लाख 65 हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी सीएसटी पोलिसात गुरनं.2236/2019 दाखल असून या चोरीचा उलगडा करण्यात यंत्रणेला यश आले असून आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चोरीचे सोने विक्रीचा बेत फसला अन् आरोपी जाळ्यात
गरीबरथ व अमरावती एक्स्प्रेसमध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी आरोपी 5 रोजी मुंबईला गेला मात्र तिथे चोरीच्या दागिन्यांची खरेदी न झाल्याने आरोपी परतीच्या प्रवासात असताना त्याच्या मोबाईल लोकेशनद्वारे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीविरुद्ध इगतपुरी, सुरत, बांद्रा, कल्याण, खंडवा, बडनेरा, खामगाव, सीएसटी आदी ठिकाणी तब्बल 21 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आरोपी हायप्रोफाईल राहनीमानाद्वारे रेल्वेचे आरक्षीत तिकीट काढून प्रवास करायचे व प्रवासी झोपल्याची संधी साधून अलगद बॅग लांबवायचा, असे एएससी राजेश दीक्षीत म्हणाले.

यांनी संयुक्त कारवाईत आवळल्या मुसक्या
लोहमार्गचे पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे, विभागीय सुरक्षा आयुक्त अजय दुबे, सहा.आयुक्त राजेश दीक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, उपनिरीक्षक कैलास जाधव, एएसआय भरत शिरसाठ, शैलेश पाटील, अजीत तडवी, सुनील इंगळे, जगदीश ठाकूर तसेच आरपीएफचे कर्मचारी रोशन खान, विनोद रावळ, भूषण पाटील, महेंद्र कुशवाह, क्राईम ब्रांचचे एएसआय अन्वर शहा, सिंटू कुमार यांनी संयुक्त कारवाईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.