धुळे । धुळे जिल्ह्यातील कुस्तीपटूंची संख्या लक्षणीय आहे आणि या कुस्तीपटूंना शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील नवनिर्मित क्रीडांगणाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील, हिलाल माळी, पंकज गोरे, अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, महेश मिस्तरी, संजय गुजराथी, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, महेंद्र राजपूत, महेंद्र गावडे, परेश उपकारे, मुझफ्फर शेख, मनीषा पवार, सुजाता गुल्हाने यांच्यासह विविध खेळांचे प्रशिक्षक, क्रीडापटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गरुड कॉम्प्लेक्स येथील नवनिर्मित क्रिडांगण सर्व सोयीसुविधांनी सज्ज झाल्यामुळे क्रीडापटूंसह नागरिकांना याचा लाभ होईल. या मैदानात असलेल्या कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन या खेळांसह नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक मुळे शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरणात मैदानी खेळांचा लाभ मिळणार आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांना मोबाईल, संगणकीय खेळांपेक्षा मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले तर जिल्ह्यातील कुस्तीपटूंसाठी लवकरच प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.