डॉ. उज्वला देवरे यांचे आवाहन; चाळीसगावात पोषण सुधार प्रकल्प
चाळीसगाव – बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मातांनी गरोदरपणात सकस आहारावर भर दिला पाहिजे, त्याचप्रमाणे चांगच्या आचार-विचारांचा अंगीकार करून प्रसन्न व उत्साही राहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला स्त्रीरोग प्रसृतीतज्ज्ञ डॉ. उज्वला देवरे यांनी दिला. धुळेरोडवरील ब्राम्हण सभा मंगल कार्यालयात नागरी बालविकास प्रकल्प विभाग भुसावळ- चाळीसगाव यांच्यातर्फे पोषण सुधार प्रकल्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
बालकांना संस्काराच शिदोरी द्यावी
व्यासपीठावर उमंग समाजशिल्पी महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील, डॉ. प्रमोद सोनवणे,डॉ. प्रसन्न अहिरे,नगरसेविका विजया पवार, अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका लता जाधव, दिपाली राणा, साधना पाटील, कविता चौधरी आदी उपस्थित होते. डॉ. देवरे पुढे म्हणाल्या की, अंगणवाडी केंद्रामार्फत किशारेवयीन व स्तनदा मातांना दिला जाणारा टिएचआर व इतर पुरक आहारात मोठ्या प्रमाणावर प्रोटीन व विटॅमिन असतात. त्या आहाराचे सेवन करावे त्यामुळे गरोदर मातेची प्रतिकारशक्ती वाढते, याचा फायदा मातेला व जन्मणार्या बालकाला होतो. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदरपणात महिलांनी योग्य काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला व योग्य तपासण्या करून घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले. उमंग महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी आपल्या मनोगतातून आईने मुलांना कसे घडवावे, त्यासाठी काय काळजी घ्यावी, योग्य वयात बालकांना संस्कारांची शिदोरी दिल्यास ते भविष्यात आदर्श व्यक्ती बनू शकतात. यासाठी महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनावे, महिलांनी स्व:ची व आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. शहरी अंगणवाडीच्यावतीने कुपोषण मुक्तीबाबत धुळेरोड भागात प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी अंगणवाडी कर्मचारी मेनका निकम, सुरेखा राजपूत, सविता बागुल, करूणा मोरे, वैशाली पाटील, स्वाती चौधरी, कविता पवार, करूणा शिरसाठ, छाया अहिरे, पुष्पा पाटील आदि उपस्थित होत्या.