न्यूयॉर्क । टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने दोन महिन्यांची गरोदर असतानाही तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते अशी माहिती समोर आली आहे. सेरेनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण गरोदर असल्याचे जाहीर केलेआहे. सेरेनाने पिवळ्या रंगाचा वन पीसमधील फोटो स्नॅपचॅटवर शेअर करत त्याला ’20 वीक्स’ असे कॅप्शन दिले आहे. म्हणजे सेरेना 20 आठवड्यांची गर्भवती आहे. याचा अर्थ जानेवारी महिन्यात सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तेव्हा ती गरोदर होती.
अॅलेक्सिससोबत झाला होता साखरपुडा
सेरेनाने स्नॅपचॅटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा स्विमसूट घातला आहे. फोटोमध्ये सेरेना आरशासमोर उभी राहून सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे. मात्र स्नॅपचॅटवरील ही पोस्ट तिने काही वेळातच डिलीट केले आहे. सेरेना आई होणार असल्याच्या वृत्ताला तिच्या प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिने आपल्या साखरपुड्याची बातमी दिली होती. सेरेना ही 35 वर्षांची आहे तर अॅलेक्सिस 33 वर्षांचा आहे. सध्या महिला टेनिसपटूंच्या जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेली सेरेना रेडिटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनला डेट करत होती. 15 महिने डेट केल्यानंतर त्यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये साखरपुडा झाला.