जळगाव । सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमणधारकांमुळे मार्केटमध्ये येणार्या महिलांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गर्दीत महिलांचा विनयभंग होत असल्याचे सोशल मिडीयातून चर्चा होत असतांना या अतिक्रमणधारकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली होती. महिलांचा सन्मानराखण्यासाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यात म्हटले होते. याबाबत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी महिलांच्या त्रासाबाबत आयुक्त जीवन सोनवणे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. यावेळी आयुक्तांनी कैलास सोनवणे यांना अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आयुक्त सोनवणे यांनी अतिक्रमण पथकाला रविवारी सकाळी 9.30 वाजताच फुले मार्केटमध्ये तैनांत केले होते. फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटच्या अतिक्रमणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून आयुक्तांनी फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच. एम. खान व यांच्या पथकाने मार्केट परिसरात जाऊन कारवाई केली. यावेळी किरकोळ व्यापार्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
फुले मार्केटमध्ये मालविक्रीसाठी अतिक्रमण
फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट ही मध्यवर्ती व्यापारीपेठ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. ग्राहक जाण्याच्या मार्गावरच गाड्या लावून वस्तूंची विक्री करण्यात येत आहे. महापालिकेने अनेक वेळा या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापही परिपूर्ण कारवाई झालीच नाही. मार्केटमध्ये आता अतिक्रमण करण्यासही जागा नसल्याने काही जणांनी पार्किंगच्या जागेवर तसेच अधिकृत दुकानांसमोर टेबल लावून मालविक्रीसाठी अतिक्रमण केले आहे. दरम्यान, रविवारी साहित्य जप्त करायला सुरुवात होताच दुकानदारांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांनी या कारवाईला विरोध केला तर काहींनी हुज्जत घातली. पथकाने ट्रकभर माल जप्त केला.
आयोजित बैठकीत चर्चा
महिलांना शहरातील मार्केटमध्ये त्रास होत असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, दिपक गुप्ता, जळगाव फस्टचे डॉ. राधेश्याम चौधरी, गिरीष कुलकर्णी, नारायण अग्रवाल यांनी नागरी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. हॉकर्संना पर्यायी जागा मनपाने उपलब्ध करून द्यावी, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हाँकर्संचे पुर्नवसन करावे फुले मार्केटमध्ये 220 हाँकर्स असून अतिक्रमण विरोधात कार्यवाही करणार्या पथकांकडून जप्त केलेल्या वस्तूंची तोडफोड करण्यात येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.