गर्दीवरील नियंत्रणासाठी गुरूवारच्या बैठकीत निर्णय घेणार

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोबाईल लसीकरण व्हॅन, बुस्टर डोस देण्यास सुरुवात

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारी रोखण्यासाठी गर्दी कमी होणे गरजेचे आहे. बाजारासह सभा, समारंभ, लग्नातील गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरूवारी दि. 13 रोजी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (ता. 10) येथे दिली. जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी मोबाईल लसीकरण व्हॅनचा शुभांरभ, फ्रंटलाईन वर्करांना बुस्टर देण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीइओ डॉ. पंकज आशिया, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार बुस्टर डोस देण्याची जळगाव जिल्ह्याची मोहीम आजपासून ‘जीएमसी’त सुरु करण्यात आली. डॉ. सुशांत सुपे यांना पहिला बुस्टर डोस देण्यात आला.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्करांपैकी ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशांनाच सोमवारपासून बुस्टर डोस देणे सुरू झाले आहे. कोरोनो लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून त्यांना 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असलेलेच यास पात्र राहणार आहे. 60 वर्षे व त्यावरील व्याधीग्रस्त व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस दिला जाईल. त्यांना कोविन अ‍ॅपच्या खात्यावरून बुस्टर डोससाठी नोंदणी करता येईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना फक्त सरकारी लसीकरण केंद्रातच बुस्टर डोस मिळेल. डोस घेण्यासाठी मोबाईलवर संदेश येईल. डोस घेतल्यावर कोविन सिस्टीममधूनच प्रमाणपत्र मिळेल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जीएमसी सुविधांनी सज्ज
पालकमंत्री म्हणाले, की दुर्गम भागासह जिल्हाभरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. सोमवारी दोन लसीकरण वाहनांचे लोकार्पण केले आहे. डॉ. रामानंद म्हणाले, की मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांना बुस्टर डोस देण्याला आता सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी मदत होणार आहे. तिसर्‍या लाटेसाठी जीएमसी सुविधांनी सज्ज झाले आहे. उखळवाडी (ता. धरणगाव) येथील मजूर महिलेची 5 दिवसांपूर्वी शेतातच प्रसूती झाली होती. रात्रीच्या वेळी वैद्यकीय कौशल्य पणाला लावत ‘जीएमसी’च्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी महिलेसह तिच्या जुळ्या बाळांचादेखील शस्त्रक्रियेद्वारे जीव वाचविला होता. या कार्याची पालकमंत्री पाटील यांनी दखल घेतली. विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे व त्यांच्यासह सहकार्‍यांचा सन्मान केला.