गर्भलिंग निदानप्रकरणी राज्यस्तरीय चौकशी

0

पुणे । पतीचा विरोध असतानाही आई-वडीलांनी गर्भलिंग निदान करून मुलीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पती प्रवीण कदम यांनी कुटुंब कल्याण कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते. याप्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करण्याचे आश्‍वासन कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्याने मंगळवारी हे उपोषण मागे घेण्यात आले.

कदम हे दौंड तालुक्यातील रहिवासी असून ते व्यवसायाने पशुवैद्यक आहेत. त्यांचा आंतरजातीय विवाह झाला आहे. पत्नी चार महिन्यांची गर्भवती असताना तिच्या आईवडिलांनी तिच्या बाळाची गर्भलिंग तपासणी केली. यामध्ये त्यांना मुलीचा गर्भ असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी तिचा जून महिन्यात गर्भपात घडवून आणला. हा गर्भपात खोटे कारण देऊन सातारा जिल्ह्यातील तरडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पैसे घेऊन केला असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. त्याची तक्रार सातारा जिल्हा शल्यचिकित्सक, पुण्यातील कुटुंब कल्याण विभागाकडे ऑगस्टमध्ये कदम यांनी केली होती. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने कदम यांनी 22 सप्टेंबरपासून पुणे कुटुंब कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, आता त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन पाटील यांनी दिले आहे. पुढील 10 दिवसांमध्ये दोषींवर कारवाई न झाल्यास 9 ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण व आत्मदहन करणार असल्याची माहिती कदम यांनी जनशक्तिसोबत बोलताना दिली.