भुसावळ । राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणार्या शासकीय रेखाकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षेस गुरुवार, 21 पासून सुरुवात झाली असलीतरी शहरातील म्युन्सिपल हायस्कूलमध्ये विद्यालय प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गळक्या वर्ग खोल्यांमध्ये बसून विद्यार्थ्यांना पाण्याचा त्रास सोसत ही परीक्षा द्यावी लागल्याने त्यांच्यासह पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्पर्धेत तालुक्यातील 27 शाळांमधील सुमारे 500 विद्यार्थी सहभागी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दाटीवाटीत बसून काढावे लागले चित्र
शाळेतील गळक्या वर्गांत पावसाचे पाणी वर्गात शिरल्याने जे काही वर्ग सुस्थितीत आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना बसून परीक्षा द्यावी लागली. शाळा व्यवस्थापनाचा सफाई व बाक व्यवस्थित लावण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे परीक्षा उशीराने सुरू झाली. चित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ देऊ, असे प्रभारी मुख्याध्यापक सोनवणे यांनी पालकांना सांगून त्यांची समजूत काढली.
या शाळांनी घेतला सहभाग
परीक्षेत अहिल्यादेवी कन्या विद्यालय, बीझेड उर्दू हायस्कूल, बियाणी मिलटरी स्कूल, बियाणी इंग्रजी, मराठी शाळा, डी.एल.हिंदी विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल, महाराणा प्रताप विद्यालय, पुं.ग.ब:हाटे विद्यालय आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना बसण्यास पुरेशा नाही. त्यामुळे एकेका बेंचवर तीन विद्यार्थ्यांना बसून चित्रकलेची परीक्षा द्यावी लागत आहे. काही मुलांना बेंच न मिळाल्याने तसेच एका बेंचवर दाटीवाटीने बसून चित्र काढणे कठीण असल्याने त्यांना खाली बसूनच परीक्षा द्यावी लागली. शाळेच्या दुर्लक्षितपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. याबाबत पालकांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली.