पुणे । पुण्याला लक्झरियस पाणी मिळत असले, तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. देशात सर्वाधिक पाणीपुरवठा हा पुणे शहराला होत असून पाण्याची गळती थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे सांगत पुढील दोन महिन्यांत गरज पडल्यास पाण्याची काटकसर करावी लागेल, असे सूतोवाच महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी केले. शहरातील पाणी, कचरा, भूसंपादनाचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. राव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत विविध योजना, अडीअडचणी आदींबाबत माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले उपस्थित होत्या.
पुण्याला मिळणार्या पाण्याबाबत बोलताना राव म्हणाले, पुण्याला मिळणारे पाणी हे ‘लक्झरियस’ आहे. पुण्याला सर्वाधिक पाणी मिळत असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. पाण्याची गळती प्रचंड असून ती थांबविण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेचा फायदा होणार आहे. तरीही पाण्याची गळती रोखून पाणी बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आगामी दोन महिन्यांमध्ये गरज पडल्यास पाण्याची काटकसर करावी लागेल, असे राव म्हणाले.
चांदणी चौक भूसंपादन
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादनामध्ये अडचणी आहेत. याबाबत आढावा बैठक घेतली असून येत्या 15 मेपर्यंत 14 हेक्टर भूसंपादन करण्यात येईल, असे अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. अधिकार्यांनी सांगितलेल्या वेळेनुसार 28 दिवस बाकी असून प्रत्येक दिवशी नेमके काय काम केले, याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. हे भूसंपादन करताना काहीही अडचण आल्यास त्याची तत्काळ माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मालमत्ताधारकांशी चर्चा करून भूसंपादनाचे काम तत्काळ संपविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राव म्हणाले.
सुधारणेला वाव आहे
महापालिकेने अनेक ऑनलाइन सेवा उपलब्ध केल्या आहेत. नागरिकांना त्या वापरण्यासाठी सोयीस्कर आहेत की नाही, हेसुद्धा पाहिले पाहिजे. एखादी योजना अगदी योग्य असली, तरी त्यात सुधारणेला कायम वाव असतो. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या सर्व योजना पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर असून आवश्यकता भासल्यास त्यात नक्कीच सुधारणा करू, असेही राव म्हणाले. कुठल्याही प्रकल्प रेंगाळला तर त्याचा खर्च वाढतो. त्यामुळे या योजनांना पुरेशा निधी मिळवून देणे, त्या वेळेत मार्गी लावणे यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा आंदोलन
राव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली. कचराप्रश्नी या ग्रामस्थांकडून 20 एप्रिलपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागरिकांशीही चर्चा करण्यात येत असून त्यातून मार्ग काढू, असे राव म्हणाले. दरम्यान, चार वर्षांपूर्वी राव यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता त्याच वेळी महापालिकेच्या आयुक्तपदी विकास देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. देशमुख यांच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या टेबलवर कचरा ओतून आंदोलन झाले होते. या घटनेची आठवण राव यांना होती. त्यांच्याही पहिल्याच दिवशी फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने जुन्या घटनांना या वेळी उजाळा मिळाला.