वाकड : गांजाची मागणी करत पानटपरी चालकासह त्याच्या मुलाला मारहाण करून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल असा 20 हजार रूपये किमतीचा ऐवज लुबाडून नेणार्या एकाला वाकड पोलीसांनी गजाआड केले. त्याचा एक साथीदार मात्र, पसार झाला आहे. विशाल विद्याधर पांडे (वय 26, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामचरीत पांडे (वय 58, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रामचरीत यांची वाकड येथील हिडन चौकात पानटपरी आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे टपरी बंद करत होते. यावेळी आरोपी विशाल आणि त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी रामचरीत यांना गांजाची पुडी मागितली. त्यावर मी गांजा विकत नाही, असे रामचरीत यांनी सांगितले. या कारणावरून दोन्ही आरोपींनी रामचरीत यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील सात हजार रूपयांची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. रामचरीत यांचा मुलगा अभिषेक मध्ये आला असता आरोपींनी त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्याकडील एक हजार 900 रूपये आणि मोबाईल असा एकूण 19 हजार 900 रूपयांचा ऐवज लुटला नेला होता. वाकड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे तपास करत आहेत.