गांजा तस्कर अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात : दिड लाखांचा गांजा जप्त

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथे हॉटेल देवजवळ चोपडा तालुक्यातील एका संशयीताच्या ताब्यातून सुमारे एक लाख 43 हजाराचा गांजा जप्त करण्यात आला. नुकतीच ही कारवाई करण्यात आली. जगदीश काशिनाथ पाटील (रा.गुजरवाडा निमगव्हाण, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना तालुक्यातील सावखेडा येथे हॉटेल देव जवळ गांजा तस्कर आल्याची माहिती मिळाली होती. हवालदार किशोर पाटील, मिलिंद भामरे, सिद्धांत शिसोदे, राहुल चव्हाण, निलेश मोरे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठल्यानंतर संशयीत पथकाला पाहताच पसार होण्याच्या प्रयत्नात होता मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. संशयीताकडील पिशवीतील पाच पाकिटांमध्ये एक लाख 43 हजारांचा 9 किलो 647 ग्राम गांजा आढळला. संशयीताविरोधात अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.