गांधी मार्केटमध्ये माथेफिरूने जाळले मिटर

0

जळगाव ।शहरातील गांधी मार्केट मधील विजय टेलर्स दुकानाचे इलेक्ट्रीक मिटर जळाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. यानंतर दुकान मालकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका माथेफिरूने ते मिटर जाळल्याचे समोर आले.दुकान मालकांनी सकाळीच माथेफिरूस पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर माथेफिरूवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले.

गांधी मार्केटमधील दुकान क्रमांक 5 विजय पंढरीनाथ शिंपी (वय 38, रा. शिवाजीनगर) यांच्या मालकीचे आहे. त्यात त्यांचे टेलरींगचे दुकान आहे. बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी निघून गेले. गुरूवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांना नागोरी चहा विक्रेत्याचा दुकानातील मिटर जळाले असल्याबाबत फोन आला. यानंतर काळी वेळातच शिंपी यांनी मार्केटमध्ये येवून दुकानातील इलेक्ट्रीक मीटरजवळ येऊन बघितले. तर मीटर जळालेले दिसले. मीटर कोणीतरी हेतूपुरस्सर जाळल्याची त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी माहिती दिली. त्यावरून शहर पोलस ठाण्याचे रतनहरी गिते, भूषण नेतकर यांनी घटनास्थळाची तपासणी केली. शिंपी यांच्या दुकानाच्या बाजुला असलेले सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. त्यात एक तरूण मीटर तोडून जाळून टाकत असल्याचे फुटेज मिळाले. फुटेज व्यवस्थीत बघितल्यानंतर तो गांधी मार्केटमध्ये फिरणारा सोमनाथ सुभाष कोळी हा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला त्याला ताब्यात घेतले.