जळगाव- गायकवाड कुटुंबियांनी जे माझ्यावर मंत्री महाजन यांच्या नावाने धमकावून, पैशांच्या आधारावर महापालिकेला हाताशी धरुन जे आरोप केले ते धांदात खोटे व तथ्यहीन आहेत, यात तथ्य असल्यास त्यांनी आरोपाचे पुरावे द्यावेत, मूळ मालक पंडीत गायकवाड यांनींच प्लॉटचा व्यवहार केला असून त्याची सर्व कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत, अशी माहिती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जर मी धमकावून, खूनाच्या धमक्या देवून पैशांच्या जोरावर घर हडपले त्यांनी माझ्याविरूध्द चार वर्षात एकही तक्रार का केली नाही, असा सवालही नगरसेवक सोनवणे यांनी उपस्थित केला.
गणपती नगरातील जागेचे मूळ मालक पंडीत गायकवाड यांंनी त्यांच्या मालकीच्या जागेची संजय भास्कर पाटील यांच्याकडे सौदेपावती केली होती, संजय पाटील यांनी संमती दिली, तसेच पंडीत गायकवाड यांनी स्वाक्षरी केली, त्यांची एक मुलगीही यावेळी साक्षीदार म्हणून हजर होती. अशा सर्वांच्या उपस्थितीत कायदेशीर रित्या जमीनीचा व्यवहार झाला आहे, तशी कागदपत्रेही माझ्याकडे असल्याचे नगरसेवक सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सदरची कागदपत्रेही पत्रकारांना दाखवून त्यावेळी 38 लाख 81 हजारात हा व्यवहार झाल्याने रक्कमही दिल्याचे ते म्हणाले. मुलांकडून चांगली वागणूक मिळत नसल्यानेच पंडीत गायकवाड यांनी जागा परस्पर विकून दिल्याचेही ते म्हणाले. मुलांच्या वागणुकीबाबत गायकवाड यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्याचा पुरावा असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन
खरेदीच्या व्यवहारात संमती देणार्या संजय पाटील यांच्याविरोधात गायकवाड यांची नातसून गायत्रीने बलात्काराची तक्रार दिली होती. मात्र त्यापूर्वी पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जामुळे ते यातून बाहेर पडले. बलात्काराच्या तक्रारीमुळे पाटील यांनी महापालिककडे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार केल्याची शक्यताही सोनवणे यांनी वर्तविली. एका दिवसात कारवाई झालेली नाही. महापालिकेने वेळोवळी गायकवाड कुटुंबियांना नोटीसा दिल्या आहेत. त्यांनी त्या स्विकारल्या नाहीत. नोटीसा मिळाल्यानंतर नातसून गायत्री हिनेच मला बीग बाजार रस्त्याकडे जाणार्या रस्त्यावर अडवून नोटीस आल्याबाबत सांगून, कारवाई थांबविण्याची विनंती केल्याचेही ते म्हणाले. अनधिकृत बांधकाम असल्याने ते घर पाडण्याची महापालिकडून होणारी कारवाई थांबविण्यासाठी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आयुक्तांना फोन केला होता, ही माहिती खुद्द आयुक्तांनीच मला दिल्याचा खुलासाही नगरसेवक सोनवणे यांनी केला.