गायत्रीचे पित्याच्या पावलावर पाऊल!

0

नवी दिल्ली । भारतीय बॅडमिंटनसाठी रविवारचा दिवस अतिशय चांगला राहिला. साईप्रणिथने आपल्याच देशाच्या श्रीकांतला मात देत सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले. तर दुसरीकडे वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरलेल्या गायत्री गोपिचंद हिने जकार्ता येथे आयोजित आंतराष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीच्या विजेतेपदांवर नाव कोरले.

सामिया इमाद फारुखीवर मात
जाकार्तामध्ये आयोजित ज्युनियर ग्रां.प्रि.मध्ये मुलींच्या एकेरीमध्ये गायत्रीने आपल्याच देशाच्या सामिया इमाद फारुखीवर मात करत 15 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. याच गटात भारताच्या कविप्रिया सेल्वम हिने कांस्यपदक पटकावले. त्याबरोबरच 15 वर्षांखालील मुलींच्या दुहेरीतही गायत्रीचा बोलबाला राहिला. तिने दुहेरीच्या अंतिम लढतीत समीया हिच्यासह दुहेरीचे विजेतेपद पटकावले. दुहेरीमध्ये कविप्रिया आणि मेघना रेड्डीने कांस्यपदक पटकावले. गायत्री गोपिचंद, सामिया इमाद फारुखी, कविप्रिया सेल्वम आणि मेघना रेड्डी या चारही जणी हैदराबादमधील पुलैला गोपिचंद राष्ट्रीय बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडू आहेत.