पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव
नवी सांगवी : पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सुरुवातीला राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सोलो तबला वादन झाले. त्यानंतर कलाश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकतालात राग मारवा व माझा भाव तुझे चरणी हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत संदीप गुरव तर तबला साथसंगत राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन आश्विनी कुमार, नगरसेविका माई ढोरे, आरती राव, सच्चिदानंद कुलकर्णी आणि पं. सुधाकर चव्हण यांच्या हस्ते झाले.
‘पुरीया धनश्री’ रंगला सुरेल
नामदेव शिंदे यांनी पुरीया धनश्री या रागामध्ये सुमिरो तेरों नाम हा विलंबित तीनतालामधील ख्याल आणि बीत गयें जुगवा हा द्रुत तीनतालामधील छोटा ख्याल अतिशय सुरेलरित्या प्रेक्षकांसमोर सादर केला. त्यानंतर त्यांनी ‘वैष्णवां घरी झळझळतीं टाळ’ हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत गंगाधर शिंदे, तबला साथसंगत नंदकिशोर ढोरे, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार, टाळासाठी दिगंबर शेडुळे तसेच तानपुर्यासाठी संजीवनी शिंदे व मणाल समुद्र यांनी साथसंगत केली.
श्रीनिवास जोशींचे गायन बहारदार
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पं. श्रीनिवास जोशी यांनी राग मारुबिहाग मध्ये रसिया आवो ना ही विलंबित एकतालात तर द्रुत तिनतालमध्ये परि मोरी नाव मजधार में या बंदिशी अतिशय बहारदारपणे सादर केल्या. त्यानंतर त्यांनी आता कोठे धावे मन हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत गंगाधर शिंदे,तबला साथसंगत रमाकांत राऊत, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार, तसेच तानपुर्यासाठी दीपक गलांडे व दिगंबर शेडूळे यांनी साथसंगत केली.कार्यक्रमाच्या पुढील पुष्पात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पं.विवेक सोनर यांनी बासुरी वादन सादर केले. त्यांनी राग धानीमध्ये आलाप व जोड सादर केल्यानंतर अतिशय उत्कृष्टरीत्या राग मतताल सादर केला. त्यांना तबला साथसंगत प्रफुल्ल काळे तसेच तानपुर्यासाठी हर्ष दवे यांनी साथसंगत केली.
‘राग शुद्ध कल्याण’ने रंगत
दुसर्या दिवसाची सांगता पं.नरेशकुमार मल्होत्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग शुद्ध कल्याण मध्ये ये करम करो कपाल ही बंदिश विलंबित झुमरा या तालात तर महादेव शिव शंभो ही बंदिश द्रुत तीनतालमध्ये अतिशय सुरेलपणे सादर केली.त्यांना हार्मोनियमवर साथसंगत गंगाधर शिंदे, तबला साथसंगत माधव मोडक, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार,तसेच तानपुर्यासाठी सत्यवान पाटोळे व दिगंबर शेडूळे यांनी साथसंगत केली.सुत्रसंचलन प्रा.नामदेव तळपे व सच्चिदानंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे छायांकन नामदेव तौर यांनी केले.