मुंबई । हिंदी सिनेसृष्टीतील पार्श्वगायिका पलक मुच्छल हिला मोबाइल फोनवर कॉल करून त्रास दिल्याप्रकरणी एका चाहत्याला आंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पलकने आशिकी 2, प्रेम रतन धन पायो, अशा चित्रपटात पार्श्वगायन केले आहे. टेलिफोन डिरेक्टरीतून आपल्याला पलक हिचा मोबाइल नंबर मिळाल्याची कबुली अटकेत असलेल्या चाहत्याने दिली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश कुमार शुक्ला असे त्या व्यक्तीचे नाव असून, पलक आणि बॉलिवूडमधील इतर गायकांना भेटण्याची त्याची इच्छा होती. मूळचा बिहारचा असणारा हा तरुण त्याच्या आवडत्या पार्श्वगायकांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. आपल्याला टेलिफोन डिरेक्टरीतून पलकचा मोबाइल नंबर मिळाल्याचे शुक्लाने सांगितले असले, तरीही आता त्याविषयीचा तपास सुरू आहे. पलकचा नंबर मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने तिला दोन-तीनदा फोन आणि मेसेज केले. तिची भेट घेण्यासाठी त्याने तिला धमकावल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शुक्लाकडे आणखी कोणत्या गायिकेचा मोबाइल नंबर तर नाही, याचाही आता तपास सुरू आहे. साधारण दोन दिवसांपूर्वी पलकने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. सर्वप्रथम तिला या व्यक्तीकडून भेट घेण्यासंबंधीचे मेसेज आले. तिने या मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या व्यक्तीचे धमकावणारे फोन येऊ लागल्यानंतर मात्र पलकने थेट पोलिसांत धाव घेतली.