गायींचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज

0

अमळनेर । गाय ही निसर्गाने मानवाला दिलेली अदभूत देणगी असून गायीचे संवर्धन व जतन झालेच पाहिजे ते होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजस्थान येथील प्रखर गोभक्त तत्वज्ञानी जगदीश गोपाल महाराज यांनी आपल्या गोकृपा कथेत सांगितले गोक्षेत्र प्रतिष्ठान संचलित तिसर्‍या गोशाळेचे भूमिपूजन प्रसंगी आयोजित गोकृपा कथेत ते बोलत होते. तालुक्यातील कवपिंप्री येथे गोक्षेत्र प्रतिष्ठान संचालित तिसर्‍या गोशाळेच्या भूमीपूजनानिमित्त गोकृपा कथा आणि तप दर्शन महोत्सवाचे आयोजन दि.27 रोजी सायंकाळी करण्यात आले होते. कवपिंप्री येथे गेल्या 6 महिन्यांपासून आपल्या क्षेत्राची समृद्धी, लोककल्याण, गोरक्षा तसेच गोशाळा भूमीची सिद्धी करण्यासाठी अखंड तप सुरू होता. मात्र याबाबत कुणालाही कानोकान खबर लागली नाही.

पर्यावरण संवर्धनासाठी अनमोल मार्गदर्शन
आपल्या निवडक अनुयायांसह जगदीश गोपाल महाराजांनी अखंडपणे 6 महिने याठिकाणी तप करून भूमीची सिद्धी केली. 27 रोजी या तपाच्या समाप्तीनिमित्त महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राजस्थान, मध्यप्रदेश तसेच इतर राज्यातून सुमारे 1500 भक्तगण याठिकाणी दाखल झाले होते. तप समाप्तीनंतर महाराजांनी उपस्थितांना गोकथेच्या माध्यमातून गोरक्षा करणे आणि त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे उत्तमरीत्या करता येते याबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले. 31 वर्ष गोचेतना व पर्यावरण पदयात्रा हल्दीघाटी पासून संपूर्ण भारतात महाराजांची सुरू आहे.हे राजस्थानचे तपस्वी संत अन्नग्रहण करत नाहीत, गाडी-वाहनांमध्ये बसत नाहीत, धन रुपये पैशाला हात लावत नाहीत आणि पादुका किंवा चप्पल न घालता संपूर्ण भारतभर पायी फिरून जनजागृती करत असतात. अशा संतांच्या हस्ते कावपिंप्री येथील गोशाळेचे भूमिपूजन झाले. या महोत्सवाला परिसरातील भाविक भक्तगणांसह गोक्षेत्र प्रतिष्ठान संचालित भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा पळासखेडे रोड अमळनेर, भगवान महावीर गोशाळा शिरूड ता.अमळनेरचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.