गारबर्डी धरणावर अडकलेल्या मुक्ताईनगरच्या नऊ पर्यटकांची सुटका

रावेर : तब्बल पावणेतीन तासांच्या कसरतीनंतर गारबर्डी धरणावर अडकलेल्या मुक्ताईनगरातील नऊ पर्यटकांची सुटका सोमवारी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास करण्यात प्रशासनाला यश आले.

या पर्यटकांची झाली सुटका
गणेश पोपटसिंग मोरे (28), आकाश रमेश धांडे (24), मुकेश श्रीराम धांडे (वय 19), पीयूष मिलिंद भालेराव (23), लखन प्रकाश सोनवणे (25), अतुल प्रकाश कोळी (22), विष्णू दिलीप बोरसे (19), रमेश सोनवणे (24, सर्व रा.एकनाथ नगर, मुक्ताईनगर) आणि जितेंद्र शत्रुघ्न पुंड (30, रा.चिखली ता.मुक्ताईनगर) हे नऊ जण सोमवारी पाल (ता.रावेर) येथील सुकी नदीवरील गारबर्डी धरण परीसरात फिरायला गेले असता सर्व पर्यटक धरणाच्या सांडव्यापासून 200 मीटर अंतरावरील टेकडीवर होते. दुपारी चार वाजता धरण 100 टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून 10 सेंटिमीटर ओव्हर फ्लो सुरू झाला. यानंतर धरणातील आवक कायम असल्याने हा विसर्ग सायंकाळी सहा वाजता 50 सेंटी मीटरपर्यंत पोहोचताच सुकी नदीला पूर आला. त्यात सांडव्याजवळ उंच टेकडी सारख्या भागात थांबलेले सर्व 9 पर्यटक पुराच्या पाण्यात वेढले गेले.

प्रशासनाच्या अधिकार्‍यांची धाव
जिल्हा प्रशासनाने धुळे येथील एसडीआरएफच्या तुकडीला पाचारण केले. रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सुकी धरणाचे शाखा अभियंता अजय जाधव व पट्टीच्या पोहोणार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रांताधिकारी कैलास कडलगदेखील दाखल झाले.

स्थानिकांची महत्त्वाची भूमिका
गारबर्डी व पाल येथील नागरिकांनी महत्त्वात भूमिका बजावली. पाल येथील संतोष दरबार राठोड, इम्रान शाह इक्बाल शाह, रतन भंगी बारेला (रा.गारखेडा), दारासिंग रेवालसिंग बारेला (गारबर्डी), गोविंदा चौधरी (रा.खिरोदा), सिकंदर गुलजार भील (रा.पाल) या सहा जणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पर्यटकांना बाहेर काढले. मदत कार्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील मदत केली. पुरात अडकलेल्या पर्यटकांना दोराच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.