गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत

0

नंदुरबार । जिल्ह्यात गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत करावयाची गाळ काढण्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. कालबध्द कार्यक्रम निश्चित करावा. त्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

प्रभावी अंमलबजावणी करा
जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. शेतकर्‍यांनीही धरणातील गाळ पावसाळ्यापूर्वी आपल्या शेतात टाकून घेतला पाहिजे. लघुसिंचन (जलसंधारण), लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग यांना अनुक्रमे 50, 50 व 30 कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते त्यांनी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. जे धरण गाळ काढण्यासाठी अंतिम केले आहे त्याचे जलयुक्त शिवार अभियानात अवलंबिण्यात आलेल्या पध्दतीनुसार जिओ टॅगिंग करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी केले. उपजिल्हाधिकारी श्रीमती भारदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली.

अधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, तहसीलदार अमोल मोरे (धुळे ग्रामीण), रोहिदास वारुळे (शिंदखेडा), महेश शेलार (शिरपूर), ज्योती देवरे (धुळे शहर), लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एम. शिंदे, डॉ. धनंजय नेवाडकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

साठवण क्षमतेत घट
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट होत आहे. या धरणांमध्ये साचलेल्या गाळाचा उपसा करीत शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुर्नस्थापित होण्याबरोबरच शेती उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. गाळ काढण्यासाठी नागरिक, शेतकरी यांचा लोकसहभाग वाढविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शेतकरी, अशासकीय संस्थांनी धरणातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे पांढरपट्टे म्हणाले.