गावकर्‍यांनी शासनाची योजना राबवून यशस्वी करावी : ना.रावल

0

नवापूर । गावाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गावकर्‍यांनी शासनाची प्रत्येक लोकोपयोगी योजना राबवून ती यशस्वी करावी आणि ग्राम सामाजिक परिवर्तन यात्रेचे शिलेदार व्हावे. राज्य स्तरावर गाव आदर्श ठरण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी निंबोणी ता. नवापूर येथे केले. राज्य शासनाच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि गाव सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील निंबोणी येथे राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा आणी विविध विभागांच्या शासकीय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश व आदेशपत्र, संगणकीकृत सातबारा उतारे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, राज्याचे माजी मंत्री आमदार सुरूपसिंह नाईक, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, पंचायत समिति सभापति सविता गावित, शेतकरी संघ अध्यक्ष अजित नाईक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, जिल्हा सरचिटणीस एजाज शेख आदी उपस्थित होते.