गावठी कुत्र्यांच्या उपद्रवाला लाल बाटलीचा पर्याय

0

फैजपूरात अनेकांनी केला प्रयोग ; रंग फिकट होताच पुन्हा कुत्र्यांचा वावर

फैजपूर (निलेश पाटील)- गावठी कुत्र्याला हुसकावलं तर ते जात नाही, काठी दाखवली तर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या वावराला सरावलेली कुत्री कोणालाच दाद देत नाहीत; पण यावर एक गावठी उपाय शोधला आहे. दारात एका बाटलीत लाल रंगाचे पाणी भरून ठेवलं की कुत्रे ती बाटली पाहून तिथे थांबत नाही, असा अनेकांचा अनुभव फैजपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे. शहरात वाड्या-वाड्यांंमध्ये अनेक घरांच्या दारादारांत लाल रंगाच्या बाटल्या दिसत आहेत.

भटक्या कुत्र्यांना रोखण्याचा सोपा उपाय
शहरातील दत्तमंदिराजवळ, त्रिवेणी वाडा तसेच गावातील काही व्यावसायीक यांच्या दुकानासमोर अशा बाटल्या ठेवल्या जातात. लाल रंगाचे आणि कुत्र्याचे वावडे काय? लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटलीला पाहून कुत्रे थबकते. आपली दिशा का बदलते, याचे शास्त्रीय कारण या क्षणी कोणीही सांगू शकत नाही पण भटक्या कुत्र्यांना रोखण्याचा उपाय म्हणून लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या दारात, परसात, गोठ्याच्या दारात ठेवण्याचा उपाय कर्णोपकर्णी सर्वत्र पोहोचला आहे. त्यामुळे भटकी कुत्री दारात येत नाहीत. दारात घाण करत नाहीत, दारात भुंकत नाहीत, असा अनुभव येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर बहुतेक घराच्या चौकटीच्या किंवा अंगणाच्या तोंडालाच तसेच गाडी पार्किंग जवळ, झाडांजवळ, घराच्या पायरी जवळ दोन्ही बाजूला दोन बाटल्या असे चित्र आहे. लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरते, हा शोध किंवा निष्कर्ष कोणी काढला, याची कोणालाही माहिती नाही; पण एक बाटली घ्यायची, त्यात पाणी भरायचे, लाल रंगाचा कुंकू टाकायचा व ती बाटली दारात ठेवायची. त्याला काही खर्च येत नाही. त्यामागे काही दैवी चमत्कार नाही. त्यामुळे करून बघायला तरी काय हरकत आहे, म्हणून हा लाल रंगाच्या पाण्याचा प्रयोग सर्वत्र सुरू आहे. आणि कुत्र्याचा उपद्रव कमी झाला असा लोकांचा अनुभव आहे. दरम्यान, लाल रंगाची उन्हामुळे तीव्रता कमी झाल्यानंतर रंग फिकट पडू लागताच कुत्र्यांचा पुन्हा उपद्रव वाढतो, असाही नागरीकांचा अनुभव आहे.

लाल बाटलीमुळे कुत्र्यांनी बदलली दिशा
घराजवळ कुत्रे येऊन खूप घाण करून ठेवत होते या त्रासाला आम्ही कंटाळे होते पण माझ्या काकांनी मला हा सल्ला दिला. आम्ही गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी दारात पाण्यात कुंकू टाकू न भरलेल्या बाटल्या ठेवल्या आहेत. कुत्री दारात येतात. लाल बाटलीकडे लक्ष गेले की, थबकतात. दिशाच बदलतात हा अनुभव आम्ही घेतला आहे आमचे बघून अनेकांनी हा प्रयोग करून बघितला असल्याचे रहिवासी हितेश संजय चौधरी म्हणाले.