जळगाव – चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात वडगावलांबे शिवारात गावठी दारुची तयार करुन तिची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यासह ईआरटी पथक व मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने सहा अड्डयावर छापा टाकून 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात ज्या शेताजवळ गावठी तयार केली जात होती त्या जागामालकासह, गूळ व नवसागर व्रिकी करणार्या विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अशाप्रकारे जागा उपलब्ध करुन देणार्या शेतमालकासह गुळ व नवसागर विक्री करणार्या व्यापार्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच घटना असून व्यापार्यांचे धाबे दणाणले आहे.
‘एसपीं’नाच गावठीच्या अड्डयांची लागली खबर
मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी दारुची निर्मिती करुन तीची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक यांना सुचना केल्या. अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी व ईआरटी पथक तसेच मेहुणाबरे पोलीस स्टेशन अशा सर्वांचे संयुक्तिक पथक तयार करण्यात आले.
गिरणानदी काठालगत गावठीचे अड्डे
पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने संयुक्तिकरित्या वडगाव लांबे शिवारात गिरणानदी काळावरील विविध सहा ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पथकाने गावठी हात भट्टी तयार करण्याासठी लागणारे एकूण 5 हजार 100 हजार लीटर गुळ व नवसागर मिश्रीत कच्चे रसायन व 13 हजार 400 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तो जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्यांदाच ज्याठिकाणी गावठी तयार केली जात होती त्या जागामालकासह, गावठी दारु तयार करण्यासाठी गूळ व नवसागर विक्री करणार्या विक्रेत्यांचा शोध घेवून त्यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
अनेक घटनांमध्ये झाडाझुडपांमध्ये तसेच शेत शिवारात गावठी दारु तयार करुन तिची विक्री केली जात असल्याचे समोर आहे. यावर आळा बसावा म्हणून यापुढे आता गावठी दारु तयार करणार्यांना जागा उपलब्ध करुन देणार्या तसेच गावठी दारुसाठी नवसागर व गुळ विक्री करणार्या व्यापार्या, विक्रेत्यांविरोधातही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. – डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक