जळगाव। आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीजच्या परिसरात रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास गावठी बनावटीचा कट्टा घेऊन एक युवक दहशत माजवत होता. त्याला शनिपेठ पोलिसांनी 4.30 वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.
मोहन टॉकीज परिसरात एक युवक गावठी कट्टा घेऊन दहशत करीत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांना मिळाली होती. तसेच दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पोलिस कर्मचारी गणेश गव्हाळे यांनी हटकले. त्यानंतर तो त्या ठिकाणाहून पसार झाला. त्याच्या शोधासाठी प्रधान यांनी मोतीलाल पाटील, नरेश सपकाळे, संजय धनगर, जितेंद्र सोनवणे, अनिल धांडे, मिलिंद कंक, गणेश गव्हाळे यांना तपासासाठी पाठविले. आसोदा रस्त्यावरील कॉलन्यांमध्ये तपास केला. त्यावेळी मोहन टॉकीज परिसरात कृष्णा उर्फ भय्या विक्रम सोनवणे या दुपारी 4.30 वाजता ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ पोलिसांना एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. त्याला पोलिसांनी अटक केली. भय्या सोनवणे हा 2014 मधील निकेश सोनवणे खून प्रकरणातील संशयीत आहे.