गावशिवच्या कवितेत दु:ख निवारण्याचे सामर्थ्य!

0

भुसावळात कवी प्रा.वा.ना.आंधळेंचे मत ; जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे पदग्रहण

भुसावळ- कमी शब्दात समर्पक आशय सांगणार माध्यम म्हणजे कविता होय. काव्यनिर्मिती व काव्यवाचन, गायनाचा छंद जोपासलेली व्यक्त सदैव हसमुख राहते. दु:ख निवारणाचे सामर्थ्य गावशिवच्या कवितेत दडलेलं आहे. खेडोपाडी कवितेला मिळणारे खुले व्यासपीठ हे तिच्या कक्षा विस्तारल्याचे द्योतक आहे, असे मत धरणगावचे साहित्यिक तथा कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.वा.ना.आंधळे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळात जय गणेश फाउंडेशन संचलित श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचा पदग्रहण व पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात झाला. त्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर मावळते अध्यक्ष एम.यु.पाटील, सचिव वसंत चौधरी, नवनिर्वाचित अध्यक्ष दिनकर जावळे, सचिव सुनंदा जावळे यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन मंगला वाणी, सुविचार वाचन अलका अडकर, शांतीमंत्र पठण रामचंद्र खर्चे यांनी केले. रमाबाई सुंदरलाल वाणी, भागवत रावजी वारके यांना संघातर्फे ज्येष्ठ सभासद म्हणून सन्मानित करण्यात आले. मधुकर वाणी, डी.व्ही.इंगळे, सुनंदा औंधकर, रजनी बेंद्रे, मंगला वाणी यांना ‘संघभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. शरदराव अंबईकर हे ‘संघगौरव’ पुरस्काराचे मानकरी ठरले. माजी अध्यक्ष स्वर्गीय नेमचंद महाजन यांना मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी शालिनी महाजन यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.

नवीन कार्यकारीणीत यांचा समावेश
पदभार स्वीकारलेल्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष दिनकर जावळे, सचिव सुनंदा औंधकर, उपाध्यक्ष विलास चौधरी, निशा क्षिरसागर, सहसचिव पी. एन. चौधरी, कोषाध्यक्ष सुरेश पाटील, ऑडिटर शांताराम बोबडे, पदसिद्ध सदस्य एम. यु. पाटील, वसंत चौधरी, कार्यकारिणी सदस्य एस. के. पाटील, डी. व्ही. इंंगळे, भास्कर पाटील, भानुदास बर्‍हाटे, मालती लोंढे, अलका अडकर, सुलोचना वारकेे, मंगला वाणी, समन्वयक अरुण मांडळकर यांचा समावेश आहे.

मुख्याधिकार्‍यांचे काव्य सादरीकरण
विंदा करंदीकरांची ‘साठीचा गजर’ ही कविता सादर करण्यात आली. त्यातील ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी’ या ओळी रसिकांना भावल्या. सुरेश भटांची ‘वय निघून गेले’ या कवितेतेतील ‘देखावे बघण्याचे वय निघून गेले, रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले’ आणि मंगेश पाडगावकरांची ‘सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत’ या कविताही सादर करून त्यांनी टाळ्या मिळवल्या.

काव्य गायनातून फुलवले हास्य
कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी काव्यगायनातून बालपणाच्या आठवणींच्या प्रांतात नेऊन ज्येष्ठांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले. ‘शर आला तो धावूनी काळ, विव्हळला श्रावणबाळ’, ‘धरू नका ही बरे फुलावर उडती फुलपाखरे’, या कविता साभिनय सादर करून त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. कविता ताल, सूर आणि लयबद्धपणे सादर केली तर तिचं गाणं होतं, असा संदेश त्यातून मिळाला.