गावांतील विकास कामे लागणार मार्गी : पाचर्णे

0

शिरुर । पुढील 25 वर्षांचा विचार करून भाजप सरकारच्यावतीने अनेक लोकहिताच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. या सरकारमुळे विकास निधी थेट ग्रामपंचायतीला मिळू लागला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायती त्याचा योग्य प्रकारे विनीयोग करून विविध विकास कामे मार्गी लावतील. त्यामुळे गावांचा चांगला विकास करता येणार असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले.शिरुर तालुक्यातील तर्डोबाचीवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आबासाहेब सरोदे, संदिप जठार, प्रशांत कदम, सरपंच वर्षा काळे, उपसरपंच संभाजी कर्डिले, ह.भ.प.गोपीनाथ पोटावळे, बांगर, विशाल घायतडक, कांतीलाल घावटे, केशव लोखंडे, जिजाबाई दुर्गे, सुरेखा कर्डिले आदिंसह सर्व सदस्य व नागरीक याप्रसंगी उपस्थित होते.

14 वित्त आयोग व आमदार निधीतून बंदिस्त गटार योजना, जि. प. शाळेत फिल्टर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दप्तर, अंगणवाडीतील कुपोषीत मुलांना आहार, कपाट, बँच, डीव्हीडी, फॅन, किचन शेड, गरोदर मातांना सकस आहार, खेळणी व गावात दिवे आदींसह विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रत्येकाल मिळणार शुद्ध पाणी
राज्यामध्ये 50 कोटींच्या योजना पुणे जिल्ह्यासाठी होत्या. त्यामध्ये शिरुर ग्रामीण व शिरुर तर्डोबाचीवाडी यांना निम्म्याहून अधिक फंड वॉटर सप्लायचा मिळालेला आहे. याअंतर्गत राबविण्यात येणार्‍या जलशुध्दी प्रकल्पामुळे आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाला शुध्द पिण्याचे पाणी मिळणार आहे. तर्डोबाचीवाडी ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांचा चांगला समन्वय असल्याने गावाचा चांगला सर्वांगीण विकास झाला आहे. पुढे देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार पाचर्णे यांनी पुढे बोलताना सांगितले.