एरंडोल । अंजनी प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा असल्यामुळे गिरणा धरणातुन सोडण्यात येणार्या पाण्याच्या आवर्तनातील प्रमुख अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तालुक्यातील अंजनी प्रकल्पात सद्यस्थितीत शून्य टक्के जलसाठा आहे.गिरणा धरणातून जामदा डाव्या कालव्याद्वारे अंजनी प्रकल्पात आवर्तन सोडणे अत्यंत आवश्यक आहे. अंजनी धरणावर एरंडोल शहरासह कासोदा तसेच तळई-उत्राण व कासोदा-आडगाव गटातील अनेक गावे पाणी पुरवठ्यासाठी अवलंबुन आहेत. एरंडोल व कासोदा या दोन शहरांसाठी सुमारे ऐंशी दश लक्ष घन फुट पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे.
जामदा डाव्या कालव्याची अत्यंत दयनीय अवस्था
सदर पाण्याचा वापर होत असतांना सुमारे 45 टक्के पाणी वाया जात असल्यामुळे संपूर्ण तालुक्यासाठी 175 दलघफु पाण्याची आवश्यकता भासणार आहे.गिरणा प्रकल्पातून अंजनी प्रकल्पात पाण्याचे आवर्तन सोडले तरी जामदा डाव्या कालव्याची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. 24 तास कालवा चालविल्यास केवळ 5 दलघफु पाणी अंजनी प्रकल्पात साठा होऊ शकते. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा पूर्ण होण्यास सुमारे 35 दिवसांचा कालावधी लागणार आहे. एवढ्या कालावधीत जामदा दावा व त्यालाच पुढे जोडणारी पारोळा विभागातून रोज 30 टक्के पाणी वाया जाण्याची भीती आहे. जामदा डाव्या कालव्याची स्थापित पाण्याची वहन क्षमता आज तिनशे क्युसेक्स असली तरी बर्याच दिवसांपासून कालव्याची दुरुस्ती केलेली नसल्यामुळे कालव्यातून आजच्या स्थितित केवळ 220 क्युसेक्स पाण्याची वहन क्षमता आहे.डाव्या कालव्याची बांध, बंदिस्ती करून व त्यातील साठलेला गाळ काढण्याची आवश्यकता आहे.
…तर कायम स्वरूपी समस्या सुटणार
गाळ काढल्यास जामदा डावा कालवा त्याच्या स्थापित क्षमतेवर चालू शकेल व पुढे अरुंद असलेल्या पारोळा ब्रांचची क्षमता 300 क्युसेक्स करून त्यापुढे असलेल्या अंजनी नदीस जोडलेल्या धोत्रे विमोचकाची विमोचन क्षमता वाढविल्यास अंजनी प्रकल्पात जलसाठा करण्यास लागणारा 35 दिवसांचा कालावधी ऐवजी केवळ दहा दिवसात अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होऊ शकतो. त्यामुळे वाया जाणार्या पाण्याची देखील कायम स्वरूपी समस्या सुटू शकते. याबाबत योग्यती दखल घेऊन तालुक्याची जीवन वाहिनी असलेल्या अंजनी प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सुचना देण्यात याव्यात व नागरिकांना दिलासा द्याव, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.