गांधीनगर-गुजरातमधील प्रसिद्ध गीर जंगलातील सिंहांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज येथील आणखी दोन सिंहांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी १० सिंहांचा मृत्यू झाल्याने ही संख्या २१ वर पोहोचली होती. आता २ सिंहांची भर पडल्याने हा आकडा २३ वर गेला आहे. एका धोकादायक व्हायरसमुळे एकाएकी इतक्या सिंहाचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जात आहे. जंगलातील काही गुरे आणि कुत्री यांच्या शरीरावर असणाऱ्या किड्यांमुळे हा व्हायरस पसरल्याचे म्हटले जात आहे.
याच व्हायरसमुळे टांझानिया येथे १९९४ मध्ये एक हजार सिंहांचा मृत्यू झाला होता. गीर जंगलातील पूर्व भागातल्या जंगलात ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त चिफ सेक्रेटरी राजीव गुप्ता म्हणाले, येथे जवळ असणाऱ्या अमरेली जिल्ह्यातील अभयारण्यातील जवळपास २० सिंहांचाही याच व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. १२ ते १६ सप्टेंबर दरम्यान मृत्यू झालेल्या चार सिंहांना ‘कॅनाइन डिस्पेंटर व्हायरस’ची (सीडीव्ही) लागण झाली होती अशी माहिती वनविभागाकडून सांगण्यात आली आहे. १२ सप्टेंबरपासून येथील सिंहांचा मृत्यू होण्यास सुरुवात झाल्याने वनविभागातील अधिकारी काहीसे तणावात आहेत. २०१५ च्या प्राणी गणनेनुसार गीरमध्ये ५२० सिंह आहेत. मात्र आताच्या २३ सिंहांच्या मृत्यूमुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.