गुंगीचे औषध देऊन लुटणार्‍याला अटक

0

पुणे । गुंगीचे औषध देऊन रेल्वेत चोर्‍या करणार्‍याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे दोन गुन्ह्यातील 11 हजार रुपयांची रोकड आणि गुंगीचे औषध मिश्रीत खजूर हस्तगत करण्यात आला आहे. अरुण शिवचंद्र झा (52, रा. उरळी कांचन) असे त्याचे नाव आहे.

झा हा निजामाबाद पॅसेंजरने प्रवास करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सातव यांना खबर्‍या मार्फत मिळाली होती. त्यांनी आरपीएफचे पोलिस निरीक्षक खटावकर यांना माहिती देऊन संयुक्त पथक तयार केले. शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास पुणे निजामाबाद एक्स्प्रेसमध्ये सापळा रचून त्याला पकडण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने महिनाभरापूर्वी मनमाड पॅसेंजरमध्ये एका व्यक्तीला गुंगीचे औषध मिश्रीत खजूर खायला देऊन 3 हजार 500 रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच उरळी कांचन रेल्वेतून मनमाड पॅसेंजरमध्ये 7 हजार 500 रूपये चोरल्याचे सांगितले.