पुणे । रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधवचा खून करणार्या सोन्या काळभोर याची निगडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहात रवानगी केली होती. तो दिसताच अनिकेत जाधव याच्या मावसभावाने व त्याच्या साथीदारांनी त्याला मारहाण केली. दशरथ राजकुमार वाघमोडे, उत्तम प्रकाश गाढवे, गोट्या उर्फ लहु गायकवाड अशी मारहाण करणार्या तीन आरोपींची नावे आहेत.
कारागृहातील बंदीना बाहेर सोडत असताना सोन्या काळभोर आला. यावेळी अनिकेतच्या खुनाचा राग मनात असलेल्या वाघमोडे व त्याच्या साथीदारांनी सोन्या काळभोरला मारहाण करण्यास सुरुवात केली. दशरथ याने व्हरांड्यातील प्लास्टीकची बादली सोन्याच्या डोक्यात मारली तर गाढवे याने तेथे पडलेला दगड सोन्याच्या डोक्यात घातला. यामध्ये सोन्या जखमी झाला. मारहाण करणार्या तिघांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावण व महाकाली टोळीत शीतयुद्ध
सोन्या काळभोर व त्याच्या साथीदारांनी आकुर्डी येथे गेल्या महिन्यात रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याचा निर्घृण खून केला होता. तेव्हापासून रावण टोळी व सोन्या काळभोर याच्या महाकाली टोळीत शीतयुद्ध सुरूच आहे. निगडी पोलिसांनी काळभोर व त्याच्या इतर साथीदारांना अटक करून येरवडा कारागृहात रवाना केले आहे.