गुगलने नोकरी देण्यास नकार दिल्यामुळेच फ्लिपकार्टचे विश्‍व उभारले :बिनी बन्सल

0

बंगळुरु : गुगलने मला एकदा नाही तर दोनदा नोकरीसाठी नाकारले म्हणूनच आपण फ्लिपकार्टचे विश्‍व उभे करू शकलो, अशी भावना ऑनलाइन शॉपिंग पोर्टल ’फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बन्सल यांनी व्यक्त केली आहे. ते बंगळुरुमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

बिनी बन्सल हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. आयआयटी दिल्लीतून पदवी मिळवल्यानंतर ते सारकॉफ या कंपनीत रुजू झाले होते. सारकॉफमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत चांगली असल्यामुळे त्यांनी दोनदा गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सीव्ही पाठवला होता. परंतु, दोनही वेळा गुगलने त्यांचा सीव्ही नाकारला होता. त्यांच्या मेलला कधीच गुगलने सकारात्मक उत्तर दिले नाही, असेही त्यांनी सांगितले. ’गुगलमध्ये तेव्हा नोकरी मिळाली असती तर मी फ्लिपकार्टचा विचारही कधी केला नसता’ अशी भावना बन्सल यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बन्सल यांना अमेझॉनमध्ये नोकरी मिळाली ती त्यांनी अवघ्या आठच महिन्यात सोडली. अमेझॉनमधील त्यांचे सहकारी सचिन बन्सल यांच्यासोबत त्यांनी फ्लिपकार्ट ही वेबसाइट सुरू केली. ही वेबसाइट आता देशातील आघाडीची शॉपिंग वेबसाइट ठरली आहे. नुकताच वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीने फ्लिपकार्टसोबत एक महत्त्वपूर्ण करारही केला ज्यामुळे फ्लिपकार्ट आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे.