गुजरात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सध्या चांगलाच गाजत आहे. या निवडणुकीत उठलेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा हा प्रचंड प्रदूषणकारी वाटू लागला आहे. प्रदूषण जातीय, धार्मिक, प्रांतीय आणि राजकीयसुद्धा आहे. नैसर्गिक प्रदूषणाचे दुष्परिणाम जेवढे घातक तेवढेच घातक परिणाम या प्रदूषणाचेही आहेत. गुजरातमध्ये आता उघड-उघड धार्मिकवाद सुरू झाला आहे. भाजपवाले राहुल गांधींच्या धर्मावर घसरलेत, तर काँग्रेसवाल्यांनी आमचा नेता कसा जानवेधारी आणि हिंदू आहे, हे सांगण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपला धर्मांधता मान्यच आहे, पण गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसनेही सर्वधर्म समभावाचे विचार खुंटीला टांगून ठेवल्याचे दिसते.
गुजरातची निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करणारी आहे. त्यामुळेच देशातील महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून मोदी यांनी गुजरातमध्ये ठाण मांडले आहे. अमित शहादेखील त्यांच्यासोबत गुजरातमध्येच आहेत. हे दोन्ही नेते गुजरात निवडणुकीत अपयशी ठरले तर त्यांचे पुढील राजकीय भवितव्य कठीण असणार आहे. त्यातच 2019च्या सार्वत्रिक निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. आज अख्खा भाजप या दोन नेत्यांच्या ताब्यात आहे. लालकृष्ण अडवाणींसारखे ज्येष्ठ नेतेसुद्धा अडगळीत पडलेत. यशवंत सिन्हांची सध्या जी फरफट चालली ती आपण पाहतच आहोत. त्यामुळे गुजरातची विधानसभा आणि 2019ची लोकसभा निवडणूक मोदी-शहा यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी फार महत्त्वाची आहे. सत्तेप्रमाणेच पक्ष ताब्यात ठेवण्यासाठी त्यांना या निवडणुका जिंकणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी कडवे आव्हान मोदी-शहा यांच्यासमोर उभे केले आहे. हे आव्हान एवढे तीव्र आहे की गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजप सत्तारूढ होईल की, 22 वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसचे पुनरागमन होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्कंठा 18 डिसेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी गुजरात निवडणुकीच्या प्रचाराने अतिशय गंभीर असे वळण घेतले आहे. काल-परवाच गुजरातमध्ये खासदार राजीव सातव यांना पोलिसांनी मारहाण केली. सातव गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी गेले होते. कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी ते गेले असताना पोलिसांनीच त्यांना मारहाण केली. यावरून गुजरातची निवडणूक कोणत्या थराला पोहोचली आहे हे लक्षात येईल. सातव हे लोकसभेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्यावर पोलीस हात उचलतात यावरून सर्व काही लक्षात येते. भाजपने कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असे ठरवल्याने वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आणि ईडीसारख्या यंत्रणांचाही वापर राजकीय लाभासाठी केला जात आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये भाजपला जेरीस आणले असले, तरी त्यांनी भाजपला शह देण्यासाठी मंदिरांना भेटी देण्याचा लावलेला सपाटा अनाकलनीय आहे. मोदी प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाऊन दौर्याला सुरुवात करतात. कारण ते एकाच धर्माचे रक्षणकर्ते आहेत आणि त्यांचा पक्ष हे उघडपणे मान्यही करत आला आहे. पण, सर्वधर्म समभावाचा डंका पिटणारे काँग्रेसचे नेते भाजपला खाली खेचण्यासाठी आता भाजपच्याच मार्गावर जात आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. राहुल गांधी कसे जानेवधारी हिंदू आहेत हे दर्शवण्यासाठी काँग्रेसनेते अगदी उतावळे झाले होते. काँग्रेसच्या आजपर्यंतच्या वाटचालीत कदाचित असा प्रसंगदेखील प्रथमच आला असावा. भाजपवाल्यांनी त्यानंतर राममंदिराचा मुद्दा उचलून धरला असून, राहुल गांधींनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणू लागले आहेत. भाजपकडून यापेक्षा दुसरी अपेक्षादेखील नाही. कारण देशाचे पंतप्रधानच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार म्हणून औरंगजेब राजवटीच्या शुभेच्छा, असे म्हणत काँग्रेसची खिल्ली उडवत आहेत. मोदींचा हा आदर्श घेत भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनीही ट्वीट केले आहे की, अयोध्येत राममंदिराचा विरोध करण्यासाठी राहुल गांधींनी ओवेसी, जिलानी यांच्याशी हातमिळवणी केली. राहुल गांधी निश्चितपणे बाबर भक्त आणि खिलजीचे नातेवाईक आहेत. बाबराने राम मंदिर नष्ट केले आणि खिलजीने सोमनाथ लुटले. नेहरूंचे वारस या दोन्ही मुस्लीम हल्लेखोरांच्या बाजूने आहेत. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यावरून गुजरात निवडणूक किती खालच्या पातळीवर घसरू लागली आहे हे लक्षात येते.
एकही गुजराती माणूस रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात जात नाही. उलट गुजरातमध्ये बाहेरील लोक रोजगाराच्या शोधासाठी येतात. त्यामुळे गुजरातमधील अनेक भागांमध्ये लघु भारत पाहायला मिळतो. देशाच्या कोणत्याही कोपर्यात जा आणि येथे एकतरी गुजराती माणूस रोजगाराच्या शोधात आला आहे का, असे विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल. तुम्हाला एकही गुजराती व्यक्ती तिथे सापडणार नाही, असा दावा जामनगरच्या प्रचारसभेत मोदींनी केला आहे. मुळात मोदींच्या या दाव्यात काहीही दम नाही. देशाच्या कुठल्याही कोपर्यात गेल्यास तेथे गुजराती माणूस मोठ्याप्रमाणात दिसतो, हेच सत्य आहे. मोदींचे हे वक्तव्य गुजरातमधील बांधवांनाच किती पचनी पडले असेल याबाबतच शंका आहे. मुळात गुजरात निवडणुकीची सर्वच राजकीय गणिते ही जाती-धर्मावर आधारित असल्याने या निवडणुकीत जातीयता येणे स्वाभाविकच आहे. मात्र, सध्या या राजकीय प्रदूषणाने गाठलेली पातळी दिल्लीच्या प्रदूषणाएवढीच चिंताजनक आहे. भविष्यात ही परिस्थिती बदलायची की आणखी मागे जायचे हे सर्वस्वी तेथील मतदारांवर अवलंबून आहे. कारण शेवटी मतदारराजा हाच सर्वश्रेष्ठ आहे. कोणाला स्वीकारायचे हे त्यानेच ठरवायचे आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीत मोदी-शहांचे जसे राजकीय भवितव्य ठरणार आहे तद्वत गुजराती जनतेचेही भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून आहे.