गुजरातमध्ये भाजपात धुसफूस; २० आमदार नाराज

0

गांधीनगर-गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३ आमदार राज्याच्या पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. याशिवाय अजून २० आमदार नाराज असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे गुजरात भाजपामध्ये धुसफूस सुरु आहे. बुधवारी भाजपाच्या ३ आमदारांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी जाहीर केली. पत्रकार परिषदेपूर्वी या तिघांनी बराचवेळ एक बैठक घेतली होती.

वाघोडीया येथील आमदार मधू श्रीवास्तव, सावलीचे आमदार केतन इमानदार आणि मांजलपूर येथील आमदार योगेश पटेल हे तिघं राज्याच्या नेतृत्वावर नाराज असून यासंबंधी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. आपले म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. आमदारांचं हे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी मोठा धक्का तर मानले जात आहेच पण राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधातील हा बंडाचा पवित्रा असल्याचंही बोलले जात आहे.

राज्याच्या नेतृत्वाकडून दुर्लक्षित केलं जातं, महत्त्व दिलं जात नाही. अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठीही आम्हाला ताटकळत ठेवलं जातं. जनतेशी निगडीत मुद्य्यांवरही सरकारी अधिकारी काही उत्तरे देत नाहीत, ही नाराजीची कारणं आहेत अशी माहिती या आमदारांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच आणखी २० आमदारांनाही याच अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे तेही नाराज आहेत असा दावा त्यांनी केला. याबाबत बोलताना आमदार केतन इमानदार म्हणाले की, पक्ष किंवा कोणा मंत्र्यावर आम्ही नाराज नाहीये, सरकारी अधिकाऱ्यांमुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, तरीही सरकारी अधिकारी आमचं म्हणणं ऐकत नाहीत. यासंबंधी आम्ही लवकरच दिल्लीमध्ये पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहोत. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे परदेशात असताना या आमदारांनी बंडाचा पवित्रा दाखवल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालं आहे.