गुजरात दंगल प्रकरणी मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; १९ रोजी सुनावणी

0

नवी दिल्ली- गुजरातमध्ये गोध्रा कांडानंतर झालेल्या दंगलीवरुन तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट देण्यात आली होती. दरम्यान मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.आरोपी नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटीने दिलेली क्लिन चिट गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. झकिया जाफरी यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज मंगळवारी झकिया जाफरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. ए एम खानविलकर यांच्या पीठाने याप्रकरणी १९ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, ५ ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात दंगलीची पुन्हा चौकशी होणार नसल्याचे म्हटले होते. झकिया जाफरी यांनी यामागे मोठा कट असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले होते. परंतु, उच्च न्यायालयाने हे मानण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास सुचवले होते.

याचिकेत वर्ष २००२ मध्ये ग्रोधा कांडानंतर झालेल्या दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांची विशेष तपास पथकाने दिलेली क्लिन चिट सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. माजी दिवंगत खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था सिटीजन फॉर जस्टिस अँड पीसने दंगलीमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या क्लिन चिट याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल केली होती.