पुणे । गुजरात निवडणुक हि बदलाची सुरवात आहे. भाजपकडून सोशल मीडियातून होणार्या प्रचाराला आणि निवडणुकीच्या तंत्राला उत्तर देण्यात काँग्रेस यशस्वी झाला आहे. गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने प्रबळ विरोधी पक्ष म्हणून सत्ताधार्यांना भिडण्याची मानसिकता काँग्रेस मध्ये निर्माण झाली असुन पुढील निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील, असे मत खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले. गुजरात 2017 : चित्र, चरित्र आणि चारित्र्य’ या डायमंड पब्लिकेशनतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशनावेळी सातव बोलत होते. राजकीय विश्लेषक प्रकाश पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी साम वाहिनीचे संपादक संजय आवटे, लेखक किशोर रत्त्काटे, राजा कांदळकर, नीलेश पाष्टे, राम जगताप आदी उपस्थित होते.
मोदींनी जनतेला गृहीत धरू नये
सरकारकडून दिल्या जाणार्या खोट्या आश्वासनांची वस्तुस्थिती काँग्रेसने मांडली. हा देश तरुणांचा आहे, तर तरुणांच्या विषयावर काम करणे आवश्यक आहे, हे काँग्रेसच्या लक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जनतेला गृहीत धरून चालणार नाही, हे लक्षात आले. चार वर्षांत एकही पत्रकार परिषद मोदी यांनी घेतली नाही. विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत नाही,” अशी टीकाही सातव ांनी केली.
काँग्रेसमध्ये आत्मविश्वास
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून काम करणे काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेत नव्हते. गुजरात निवडणूक आणि त्यामध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहू शकतो, याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला. राहुल गांधी हे प्रभावी विरोधी पक्षनेते होऊ शकतात, हे या निवडणुकीत समोर आले. हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांचे मुद्दे महत्त्वाचे ठरले. विकासासाठी देशांत सांगितले जाणारे गुजरात मॉडेल’ हे फक्त मार्केटिंगचा भाग असल्याचे काँग्रेसने मतदारांना पटवून दिले.