गुजरात मांगे जबाब।

0

गुजरातमधील विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला येऊन पोहचली आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यंमत्र्याच्या प्रचारानंतर आता दस्तखूद् गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता प्रचारासाठी होमग्राउंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा गुजरातच्या दौर्‍यावर रवाना होण्यापुर्वी काँग्रेसचे उपाध्यक्श राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून, गुजरातच्या जनतेशी जे वादे करण्यात आले आहेत ते पूर्ण का झाले नाहीत हे त्यांना पंतप्रधानांकडून जाणून घ्यायचे आहे. खरंतर गुजरातच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राहुल गांधींनी ट्विटरवरून मोंदीवर नियमितपणे निशाणा साधला आहे. आता याच टिवटिवला काँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीसाठी आपल्या रणनितीचा भाग बनवला आहे. गुजरातमधील निवडणुकीच्या काळात राहुल गांधी पंतप्रधानांना दररोज एक प्रश्‍न विचारणार आहेत. या मालिकेतील पहिला प्रश्‍न राहुल गांधी यांनी बुधवारी विचारला. काँग्रेसच्या उपाध्याक्षांनी ट्वीट करत विचारले, 22 सालो का हिसाब, गुजरात मांगे जबाब, गुजरातमधील परिस्थितीवर पंतप्रधानांना पहिला प्रश्‍न: 2012 मध्ये तुम्ही 50 लाख नवीन घरं देण्याचे वचन दिले होते. पण मागील पाच वर्षात तुम्ही केवळ 4.72 लाख घर निर्माण केलीत. गुजरातच्या जनतेशी केलेला वाद पूर्ण करण्यासाठी आणखी 45 वर्षे लागणार का?, मोदीजी तुम्हीच याचे उत्तर द्या. बुधवारी विचारलेल्या या प्रश्‍नामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस आता मागील निवडणुकांदरम्याने दिलेल्या वचनांची सारखी आठवण करून देत राहणार आणि भाजपला त्याचे उत्तर देण्यास भाग पाडणार असेच चित्र सध्या तरी दिसते आहे.

भाजपची सत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर पंतप्रधान गुजरातच्या रणधुमाळीत उतरल्यामुळे भाजप गुजरातमध्ये आपली ताकद पणाला लावत आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे सतत हल्लाबोल करून भाजपला बॅकफूटवर पाठवण्यासाठी गुजरात मागे जबाब या नवीन रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या या रणनीतीचा परिणाम कसा होतोय हे लगेचच बुधवारी पहायलाही मिळाले. बुधवारी राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात जलाभिषेक केला. त्याचवेळी सोमनाथ मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर जाहीर सभेत बोलताना मोंदीनी, ज्यांनी सोमनाथ मंदिर बांधण्यास विरोध केला त्यांचेच नातेवाईक आता त्याठिकाणी अभिषेक करण्यासाठी जात आहेत असा हल्लाबोल केला. आणखी एका ठिकाणी जाहिरसभेत बोलताना इंदिरा गांधी नाकाला रुमाल लावून गुजरातमध्ये यायच्या याची आठवण मोदींनी करुन दिली. त्या गोष्टीचा पुरावा म्हणून मोंदीनी, गुजरातच्या दौर्‍यात इंदिरा गांधी नाकाला रुमाल लावून असल्याचे एक चित्रही लोकांना दाखवले. या दोन्ही सभांंमध्ये त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली. पण राहुल गांधीच्या प्रश्‍नांच्या मालिकेतील पहिल्या प्रश्‍नाला उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. त्यामुळे आगामी काळात राहुल गांधींच्या पोतडीतून कुठले कुठले प्रश्‍न येतात आणि भाजप पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे एकनिष्ठ आणि पक्शाचे अध्यक्श अमित शहा त्या प्रश्‍नांना कशी उत्तरे देतायेत. या सवाल जबाबाच्या रस्सीखेचीत भाजप राज्यातील प्रश्‍नांना बगल देतेय की काँग्रेसच्या आमदार. खासदारांनी केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या रणनीतीचा फायदा कोणाला होणार? त्याचे चित्र निवडणुकांच्या निकालावरूनच स्पष्ट होईल.

– विशाल मोरेकर
जनशक्ति प्रतिनिधी, मुंबई
9869448117